आपकी पहचान सच्ची है, आपकी आवाज सच्ची है!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 06:56 IST2026-05-18T06:55:37+5:302026-05-18T06:56:04+5:30
जगभरात ट्रान्स व्यक्तींना राज्यसंस्थेकडून नव्याने मोठे धोके निर्माण झाले आहेत. तरीही या महाकाय अन्याय्य यंत्रणेविरोधात जेन-झी उभी राहते आहे.

आपकी पहचान सच्ची है, आपकी आवाज सच्ची है!
- राही श्रु. ग., सीनिअर रिसर्च फेलो
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
‘वाटाघाटींसाठीच्या टेबलापाशी केवळ एक जागा मिळावी म्हणून नाही, तर जिथे वाटाघाटी आणि निर्णय घेतले जातात, त्या टेबलाचीच पुनर्व्याख्या आम्ही करू पाहतोय,’ केट ॲलेक्झँडर लिखित ‘जनरेशन ब्रेव्ह’ या पुस्तकातलं हे उद्धरण वाचकांचं लक्ष वेधून घेतं. पर्यावरणीय संकटाविषयी ज्याप्रमाणे जेन-झीने सर्व पिढ्यांना जागं केलं, तसंच लिंगभाव, त्याअनुषंगाने असलेल्या अनेक ओळखी आणि लैंगिकतेच्या विविध छटांविषयीदेखील जेन-झी मोठ्यांना सजग करू पाहते आहे. जन्मतः ‘मुलगी’ किंवा ‘मुलगा’, हा जो शिक्का मारला जातो, त्यासकटच सर्वांनी जगणं अपेक्षित असतं. मात्र, अनेकांसाठी हा कप्पा, हा शिक्का एक जीवघेणा तुरुंग होऊन जातो.
या कप्प्यांमध्ये जे जगू शकतात त्यांना ‘सिस’ (cis- cisgender) म्हटलं जातं, तर ज्यांचा त्यात जीव घुसमटतो, त्यांना ‘ट्रान्स’ (trans- transgender) व्यक्ती म्हटलं जातं. आपल्या लिंगभावानुसार आपली लैंगिकतादेखील निर्धारित केलेली असते. प्रत्यक्षात या लैंगिकतेच्या पल्याड कितीतरी रंग आहेत! सामाजिक अधिमान्यता असणाऱ्या सिस-हेट (cis-het, cisgender-heterosexual) चौकटीमध्ये न बसणारे लोक साधारणपणे स्वतःला ‘क्विअर’ म्हणतात.
आधुनिक जगात पृथ्वीच्या पाठीवरच्या बऱ्याच समाजांमधल्या हिंसेमुळे त्यांना अस्तित्वाची लढाई लढावी लागली आहे. भारतासारख्या देशात हिजडा, किन्नर अशा काही क्विअर समाजातल्या लोकांना भेदभाव आणि हिंसेला तोंड द्यावं लागत असलं तरी त्यांना काही प्रमाणात सामाजिक अधिमान्यतादेखील आहे. बहुसंख्य क्विअर लोकांसाठी मात्र ही अस्तित्वाची लढाई कितीतरी अधिक बिकट आहे.
वॉशिंग्टन डी. सी.मधली सेज ग्रेस डोलन- सॅन्ड्रिनो ही आफ्रिकन-अमेरिकन, लॅटिन अमेरिकन ट्रान्स मुलगी. वयाच्या तेराव्या वर्षी तिने आपण ट्रान्स असल्याचं जाहीर केलं आणि अगदी शाळेपासूनच तिला प्रचंड छळाला तोंड द्यावं लागलं. बाथरूमच्या वापरापासून रस्त्यावरच्या सुरक्षेपर्यंत अनेकांसाठी जगण्यात गृहीत धरलेल्या कितीतरी गोष्टी तिच्यासाठी मोठ्या जिकिरीच्या होत्या. या विषमता आणि हिंसेवर तिने आवाज उठवायला सुरुवात केली आणि शालेय भेदभावाविषयीच्या ओबामा सरकारच्या धोरणनिर्मितीमध्ये २०१६ साली ती सहभागी झाली. मात्र, ट्रम्प सरकार येताच त्यांनी या धोरणांना मागे घेऊन ट्रान्स तरुणांच्या विरोधात पावलं उचलायला सुरुवात केली. ग्रेस डगमगली नाही. इतर ट्रान्स तरुणांसोबत तिचा लढा आजही सुरू आहे.
जगभरातल्या कितीतरी देशांमध्ये ट्रान्स व्यक्तींना राज्यसंस्थेकडून नव्याने मोठे धोके निर्माण झाले आहेत. गेल्या काही महिन्यांत भारतानेदेखील केंद्र सरकारच्या ट्रान्सजेंडर पर्सन्स (प्रोटेक्शन ऑफ राइट्स) सुधारणा कायद्याच्या (२०२६) रूपाने हा भीषण हल्ला पाहिला आहे. सामाजिक सांस्कृतिक अधिमान्यता असणाऱ्या मोजक्या ट्रान्स समूहांव्यतिरिक्त बहुसंख्य भारतीय ट्रान्स व्यक्तींचं अस्तित्व नाकारणाऱ्या या सुधारणेविरोधात उभारलेल्या लढ्यात कितीतरी तरुण ट्रान्स सामील झाले. मिलेनियल आणि जेन-झी या सीमारेषेवर असलेला विहान वी हा आंबेडकरवादी स्त्रीवादी क्विअर ट्रान्स मुलगा त्यातलाच एक. देशभरातल्या मोठ्या लढ्यानंतरही ही अन्याय्य सुधारणा संसदेत पारित झाली तेव्हा आपल्या ट्रान्स मित्र-मैत्रिणींना धीर देताना सोशल मीडियावर विहान म्हणाला, ‘आपकी पहचान सच्ची है, आपकी आवाज सच्ची है!’ समाज आणि राज्यसंस्था आपल्या विरोधात उभी आहे, असं पाहून निराशेच्या गर्तेत असताना एवढ्या शब्दांनीही किती बळ मिळतं, हे विहानला माहीत आहे. म्हणूनच या महाकाय अन्याय्य यंत्रणेविरोधात उभे राहून विहान आणि त्याचे साथी आपल्या ट्रान्स मित्र-मैत्रिणींसोबत प्रेमाने आणि ताकदीने उभे आहेत.
raheeshrutiganesh@gmail.com