बॉसने दिला जबरदस्त बोनस, नोटांची बंडलंच समोर ठेवून म्हणाला, जेवढी नेता येतील तेवढी न्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 17:55 IST2026-02-25T17:54:24+5:302026-02-25T17:55:40+5:30
Jara Hatke News: सध्या चीनमधील एक कंपनी आणि तिथल्या बॉसची एकच चर्चा सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे हा बॉस बोनस देण्याच्या आगळ्या वेगळ्या पद्धतींसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याच्या कर्मचाऱ्यांनाही त्याच्याकडून मिळणाऱ्या बोनसबाबत उत्सुकता असते.

बॉसने दिला जबरदस्त बोनस, नोटांची बंडलंच समोर ठेवून म्हणाला, जेवढी नेता येतील तेवढी न्या
विविध कंपन्या आस्थापनांकडून वर्षातील ठराविक वेळी कर्मचाऱ्य़ांना ठराविक रक्कम बोनस म्हणून दिली जाते. दरम्यान, सध्या चीनमधील एक कंपनी आणि तिथल्या बॉसची एकच चर्चा सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे हा बॉस बोनस देण्याच्या आगळ्या वेगळ्या पद्धतींसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याच्या कर्मचाऱ्यांनाही त्याच्याकडून मिळणाऱ्या बोनसबाबत उत्सुकता असते. कारण तो आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून निश्चित रक्कम देत नाही तर रोख रक्कम समोर ठेवून त्यामधून जेवढी घेता येईल, तेवढी रक्कम घ्या म्हणून सांगतो.
एका चिनी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार सध्या एक चिनी कंपनी आणि तिचा बॉस सुमारे २७० दशलक्ष युआन नफ्यामधील सुमारे १८० दशलक्ष युआन एवढ्या रकमेचा बोनस वाटून चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. १३ फेब्रुवारी रोजी हेनान कुआंगशान क्रेन कंपनी लिमिटेडने आपला वार्षिय समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये सुमारे ६० दशलक्ष युआनपेक्षा अधिकची रोख रक्कम ही बोनस म्हणून वाटण्यात आली. यावेळी ७ हजार लोकांसाठी भोजनाची ८०० टेबले लावण्यात आली होती. त्यानंतर या टेबलांवर नोटांची बंडले ठेवण्यात आली. तसेच कर्मचाऱ्यांना त्यांचा बोनस घेण्यासाठी बोलावण्यात आले.
या कर्मचाऱ्यांना एका निश्चित वेळेमध्ये नोटांची बंडले उचलून रक्कम मोजायची होती. या निर्धारित वेळेत कर्मचारी जेवढ्या रकमेची मोजणी करतील तेवढी रक्कम त्यांना बोनस म्हणून देण्यात येत होती. त्यानंतर प्रत्येक कर्मचारी नोटांच्या बंडलांमधून नोटा काढून मोजून घेत होता. तसेच निर्धारित वेळेनंतर जेवढ्या नोटा त्या कर्मचाऱ्याने मोजल्या असतील तेवढ्या नोटा त्याला बोनस म्हणून मिळत होत्या.