(Image Credit : www.engadget.com)
सामान्यपणे सोन्यापासून दागिने तयार केले जातात. पण ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी असं सोनं तयार केलंय जे दुसऱ्याच कामासाठी वापरलं जाणार आहे. हे जगातलं सर्वात पातळ सोनं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ लीड्सच्या संशोधकांनी सोन्याचं हे नवं रूप तयार केलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे सोनं मनुष्याच्या नखांच्या साधारण १० लाख पटीने जास्त पातळ आहे. याची जाडी ०.४७ नॅनोमीटर इतकी आहे. हे सोनं दोन गोष्टी मिळून तयार करण्यात आलं आहे. असं मानलं जात आहे की, हे सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या सोन्यापेक्षा १० पटीने अधिक उपयोगी आहे.
वैज्ञानिकांनुसार, सोन्याचं हा २-डी फॉर्म टेक्नॉलॉजिच्या विकासात फार फायदेशीर ठरणार आहे. याचा वापर कॅन्सर बरा करणाऱ्या मेडिकल उपकरणात आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगात वाढेल. सध्या एअरोस्पेस, इंजिनिअरींग आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील उपकरणे तयार करण्यासाठी सोन्याचा वापर केला जातो.
वैज्ञानिकांनी सांगितले की, सोन्याचं हे नवं रूप मेडिकल परिक्षणांची गति आणि पाणी स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेला आणखी चांगलं करेल. सोबतच याच्या वापराने मशीनींची किंमतही वाढेल, ज्याने निर्मात्यांना चांगलाच फायदा होईल.
या रिसर्चशी संबंधित प्राध्यापक स्टीवन इवांस म्हणाले की, '२-डी सोन्याच्या वापरासंबंधी काही आयडिया आम्हाला मिळाल्या आहेत. याचा वेगवेगळ्या ठिकाणी वापर करून फायदा करून घेता येऊ शकतो. आम्हाला हे माहीत आहे की, सध्याच्या तुलनेत हे सोनं पुढे अधिक प्रभावी ठरेल'.