‘त्या’ मुलीला नाकारताहेत शाळा

By Admin | Updated: May 6, 2014 15:27 IST2014-05-06T14:59:34+5:302014-05-06T15:27:14+5:30

वानवडीतील एका शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर संबंधित शाळेने जबाबदारी झटकण्याचा संतापजनक प्रकार केला.

The school is denying that girl | ‘त्या’ मुलीला नाकारताहेत शाळा

‘त्या’ मुलीला नाकारताहेत शाळा

पुणे : वानवडीतील एका शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर संबंधित शाळेने जबाबदारी झटकण्याचा संतापजनक प्रकार केला. आता या मुलीने दुसर्‍या शाळेत प्रवेश घेतला असून त्या ठिकाणीही आमची बदनामी होत असल्यामुळे मुलीचा अन्य शाळेत प्रवेश घ्या, अशी सूचना शाळेने पालकांना केली आहे. दोन्ही शाळांनी अशाप्रकारे विद्यार्थ्यांना वागणूक दिल्यास पालकांनी काय करायचे, असा सवाल नगरसेविका नंदा लोणकर यांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित केला.
वानवडीत हा प्रकार ऑक्टोबर महिन्यात घडला होता. जानेवारीपर्यंत त्याबाबत शाळा प्रशासन, मुख्याध्यापिका यांनी कोणतीही कारवाई केली नाही. दोन आठवड्यांपूर्वी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संस्थाचालक अशोक गुप्ता यांनी राजीनामा दिला. मुख्याध्यापिकेस निलंबित करण्यात आले. 
दरम्यान, या मुलीच्या पालकांनी दुसर्‍या शाळेत प्रवेश घेतला. मात्र, या प्रकाराबाबत वारंवार बातम्या येऊ लागल्यामुळे शाळा प्रशासनाने मागील आठवड्यात पालकांना बोलावून घेतले आणि मुलीचा अन्य शाळेत प्रवेश घ्या, अशी सूचना केली, त्यामुळे पालक हतबल झाले. 
अशाप्रकारे दोन्ही शाळा आपली जबाबदारी झटकत असतील, तर मुलीच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण, असा प्रश्न नगरसेविका लोणकर यांनी उपस्थित केला. काही नगरसेवकांनी हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)

Web Title: The school is denying that girl