Two votes in Congress over support for Shiv Sena | शिवसेनेला पाठिंब्याबाबत काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह
शिवसेनेला पाठिंब्याबाबत काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह

जळगाव : काँग्रेसची विकासकामे, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे योगदान याबाबत शिवसेनेने वारंवार प्रशंसा केली आहे़ भाजप व सेनेत हा मुलभूत फरक असून पाठिंब्याबाबतचा प्रस्ताव सेनेकडून आल्यास विचार होऊ शकतो, असे संकेत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिले. मात्र, पाठिंब्याबाबत पक्षात दोन मतप्रवाह असल्याचेही ते म्हणाले.
शुक्रवारी दुपारी काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ जनतेने आम्हाला सक्षम विरोधी म्हणून निवडून दिलेले आहेत ती भूमिका आम्ही पार पाडू, असेही ते म्हणाले़ नोटबंदीचा निर्णय अत्यंत दुर्देवी असून गेल्या तीन वर्षांपासून या निर्णयाची पुण्यतिथी काँग्रेस करीत आहे़ अर्थव्यवस्थेची दयनीय स्थिती झालेली आहे. भूक बळींची संख्या वाढली़ बेरोजगारी ४५ टक्क्यांनी वाढली, बँक घोटाळ्यांमध्ये पाच वर्षात ७३ टक्क््यांनी वाढ झाली़ या घटनांमुळे सरकारच्या धोरणांविषयी शंका निर्माण झाली, कुठे चालला आहे देश माझा अशी परिस्थिती निर्माण झाली व त्याचा परिणाम म्हणून भाजपच्या जागा घटल्या़ कुठलाही निर्णय नसताना काही घटना नसताना भारतीय अर्थव्यवस्थेची ५ ट्रीलीयनकडे वाटचाल हे विधान हास्यास्पद आहे़ सरकारी कंपन्यांचे खच्चीकरण करण्यात आल्याचा आरोप तिवारी यांनी केला़
खान्देशला फायद्याचा ठरणार नदी जोड प्रकल्प ३१ जुलै २०१९ मध्ये भाजप सरकारने रद्द केल्याचे ते म्हणाले.
अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबाबामुळे फडणवीस सरकारने हा करार रद्द केला व यामुळे जळगावचे मोठे नुकसान झाल्याचे तिवारी यांनी सांगितले़
दरम्यान, जनता अजुनही भाजप सेनेकडून आशावादी होती म्हणून त्यांना संधी दिली आहे़ मात्र, आम्हाला सक्षम विरोधीपक्ष म्हणून कौल मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले़ नोटबंदीच्या मुद्दयावरून तिवारी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले़ खासगी कंपन्यांना रेड कार्पेट घालून द्यायचा या सरकारचा मूळ उद्देश असल्याचे ते म्हणाले़
काँग्रेसच्या जिल्ह्यातील कमी जागांबाबत बोलताना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ संदीप पाटील यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी राष्ट्रवादीला अत्यंत कमी जागा देण्यात आल्या होत्या़ नांदेड मध्ये कॉंग्रेस आठ तर राष्ट्रवादी केवळ एका जागेवर लढली़ त्यामुळे जागा वाटप हा वरिष्ठांचा निर्णय असल्याचे अ‍ॅड़ संदीप पाटील यांनी स्पष्ट केले़ यावेळी श्याम तायडे, श्रीधर चौधरी आदी उपस्थित होते़

पाठिंब्याबाबत दोन मतप्रवाह
शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत़ भाजप घटनात्मक चौकटी मोडायला निघाला आहे़ त्यामानाने शिवसेना पक्ष आक्रमक असला तरी कुणाचा द्वेष करणारा नाही, त्यांनी वारंवार काँग्रेसच्या विकासकामांची प्रशंसा केली आहे़ त्यामुळे शिवसेनेला सत्तास्थापनेत पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसमध्ये हो व नाही असे दोन मतप्रवाह आहेत, सोनिया गांधी यांच्याकडून कुठलाही निर्णय याबाबत झालेला नाही़ शिवाय शिवसेनेकडून तसा कुठलाही प्रस्ताव काँग्रेसकडे आलेला नाही, असे तिवारी यांनी यावेळी स्पष्ट केले़

Web Title: Two votes in Congress over support for Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.