अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 16:08 IST2026-04-16T15:58:00+5:302026-04-16T16:08:47+5:30
Strait of Hormuz Blockade : अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीची इराणसाठी नाकेबंदी केली. नाकेबंदी असतानाही इराणच्या सुपरटँकरने होर्मुझ सामुद्रधुनी पार करत आखातात प्रवेश केला.

अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
Iran vs USA News: पश्चिम आशियातील तणावाच्या काळात एक घटना होर्मुझ सामुद्रधुनी आणि पर्शियन गल्फमध्ये घडली आहे. अमेरिकेने इराणविरोधात भूमिका घेत होर्मुझ सामुद्रधुनी आणि बंदरांची नाकेबंदी केली आहे. मात्र, अमेरिकेच्या नाकेबंदीला वाकुल्या दाखवत इराणचे सुपरटँकर होर्मुझ सामुद्रधुनी पार करत आखातात पोहोचले आहे.
इस्लामाबादमध्ये इराण अमेरिका यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या लष्कराने होर्मुझ सामुद्रधुनी आणि इराणी बंदरांची नाकेबंदी केली. इराणची तेल निर्यात रोखून त्यांच्या अर्थव्यवस्थेला तडाखा बसावा, या हेतूने ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला.
इराणच्या बंदरावर पोहोचले जहाज
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे अनेक जहाजांना परत जावे लागले. पण, इराणच्या एका जहाजाने नाकेबंदीला हुलकावणी देत होर्मुझ पार केली. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या बंदीनंतरही सुपरटँकर होर्मुझ सामुद्रधुनी पार करून इमाम खामेनेई बंदरावर पोहोचले.
मिळालेल्या माहितीनुसार, आरएचएन नावाचे एक महाकाय जहाज इराणच्या बंदरावर दाखल झाले आहेत. २० लाख बॅरल तेल वाहून नेण्याची क्षमता या जहाजाची आहे. त्यामुळे हे जहाज महत्त्वाचे आहे. एका दिवसापू्र्वीच अलिसिया नावाचे जहाजी नाकेबंदी असताना होर्मुझ पार करून आले.
अमेरिकेसमोर शरणागतीस इराणचा नकार
इराणवर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने नाकेबंदी केली. पण, इराणकडून हा दबाव झुकारून लावला जात असल्याचे दिसत आहे. अमेरिका नाकेबंदी किती कठोरपणे राबवणार याची चाचपणी करण्याचे प्रयत्न इराणकडून केले जात असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, त्यांनी आतापर्यंत १० जहाजे रोखली आहेत. अनेक जहाजांना परत जावे लागले आहे. पण, इराणच्या सुपरटँकरने नाकेबंदी झुगारून लावली आहे.