एकाच रात्रीत तीन घरफोड्या

By Admin | Updated: December 5, 2014 15:06 IST2014-12-05T15:06:13+5:302014-12-05T15:06:13+5:30

शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत देवपुरात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी केली. चोरट्यांनी रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास केला आहे.

Three house buffs in a single night | एकाच रात्रीत तीन घरफोड्या

एकाच रात्रीत तीन घरफोड्या

>धुळे : शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत देवपुरात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी केली. चोरट्यांनी रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 
देवपुरातील पंचवटी परिसरातील सुरेश चौधरी हे कुटुंबासह घरातील वरच्या मजल्यावर झोपलेले होते. त्यामुळे त्यांनी खालच्या घराला कुलूप लावले होते. चोरट्यांनी बुधवारी रात्री कुलूप तोडून ते एका कापडामध्ये गुंडाळून ठेवून घरात प्रवेश केला. कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकून रोख ४६ हजार व तीन तोळे सोन्याची पोत व चार तोळे सोन्याच्या बांगड्या, असा एक ते दीड लाखाचा ऐवज लंपास केला. पहाटे चौधरी हे उठल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
दरम्यान, घटनास्थळी देवपूर पोलिसांनी पाहणी केली. श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. श्‍वान पथकाने मागील गल्लीपर्यंत माग दाखविला. तेथे चौधरी यांचे पाकीट व कापडात गुंडाळलेले कुलूप आढळून आले. 
इस्लामपुरा परिसर
देवपुरातील इस्लामपुरा परिसरातील व्यापारी ईस्माईल अय्युब खाटीक यांच्याकडे दुसरी घरफोडी झाली. तेदेखील कुटुंबासह वरच्या मजल्यावर झोपले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून चार ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह १५ हजार रुपये रोख असा ऐवज चोरी केला. विशेष म्हणजे चोरट्यांनी घरातील लाईट लावून चोरी केली. पहाटे चोरी झाल्याचे उघडकीस आले. 
वाडीभोकर रोड परिसर
वाडीभोकर रोडवरील गल्ली क्रमांक १0 मधील नवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी पी. आर. जोशी हे ठाणे येथे मुलीकडे गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याचे समजते. 
त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने शेजारच्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी जोशींसह पोलिसांना माहिती दिली. 
घरफोडी झाल्याची माहिती मिळताच जोशी यांना धक्का बसला. त्यामुळे त्यांची प्रकृतीही ढासळली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. देवपूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
 
पोलीस अधीक्षकांनी घेतली दखल 
■ शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून घरफोडी, दुचाकी चोरी, धूमस्टाईलने पैशांची बॅग, पर्स, सोनसाखळी खेचणे तसेच वृद्धांसह महिलांची फसवणूक करणे अशा घटना सुरू आहेत. पोलीस मात्र सुस्त आहेत. पोलिसांना चोरटे सापडत नसल्याचे चित्र आहे. दररोज घरफोडीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज पोलीस अधीक्षकांनी दखल घेऊन पोलीस अधिकार्‍यांना धारेवर धरत सूचना केल्या., अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 
१) इस्लामपूर परिसरातील व्यापार्‍याच्या घरी झालेली चोरी.
२) पंचवटी येथील घरात झालेली चोरी.
३) वाडीभोकर रोडवर आरोग्य विस्तार अधिकार्‍याच्या घरी झालेली चोरी. 

Web Title: Three house buffs in a single night