जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 15:46 IST2025-07-01T15:46:01+5:302025-07-01T15:46:36+5:30
Jalgaon Latest News: नोकरीसाठी नाशिकला गेलेल्या मुलीचे कोल्हापूरच्या मुलाशी लग्न झाल्याचे प्रकरण समोर आले. याच प्रकरणात मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. पण, नक्की घडलं काय होतं?

जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
Jalgaon Crime News: जळगावमधील तरुणीला नोकरीच्या आमिषाने नाशिकला नेत काही जणांनी तिचे कोल्हापूरच्या मुलाशी परस्पर लग्न लावून देण्याच्या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. या प्रकरणात आता मुलीशी लग्न केलेल्या मुलानेच वधू व मध्यस्थांविरुद्ध तक्रार दिली दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात आता पाच जणांना अटक केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुलीसह पाच जणांविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. आशिष सदाशिव गंगाधरे (३०, रा. थेरगाव, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे या तरुणाचे नाव आहे.
जळगावच्या मुलीशी लग्न करणाऱ्या तरुणाची तक्रार काय?
आशिषने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वधू, मीनाक्षी जैन, सुजाता ठाकूर, अक्षय ठाकूर व धनश्री या मंडळींनी मला मुलगी दाखविली. मी त्यांना एक लाख ९५ हजार रुपये दिले आणि ३ फेब्रुवारी रोजी लग्न झाले. त्यानंतर ही मुलगी एप्रिल २०२५ मध्ये जळगावात आल्यापासून घरी परतली नाही, शिवाय तिने पैसे, दागिनेही परत दिले नाही.
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, या मुलीचा मोबाइल बंद असल्याने आशिष गंगाधरे व आप्पासाहेब गंगाधरे यांनी २४ जून रोजी जळगावात येत मुलीच्या आईकडे विचारणा केली. त्यावेळी ज्यांनी लग्न लावून दिले, त्यांना विचारा, असे तिच्या आईने सांगितले.
त्यानंतर आशिष गंगाधरे याने रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मुलगी, मीनाक्षी जैन, सुजाता ठाकूर, अक्षय ठाकूर व धनश्री यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मुलीच्या वडिलांच्या आत्महत्येप्रकरणी चार जणांना अटक
विवाहासाठी दिलेले पैसे व दागिने परत मिळण्यासाठी मुलाकडून धमक्या दिल्या जात असल्याने मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.
सचिन दादाराव अडकमोल, मनीषा उर्फ मीनाक्षी दिनेश जैन (दोन्ही रा. जळगाव), मुलीचा पती आशिष सदाशिव गंगाधरे व त्याचा चुलत भाऊ आप्पासाहेब बजरंग गंगाधरे (दोन्ही रा. थेरगाव, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
लग्नाची मुलीच्या आईला होती माहिती
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आतापर्यंतच्या तपासातून मुलाच्या फसवणूक प्रकरणात मुलीच्या आईचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. मुलीचे लग्न करण्यात आल्याचे आईला आधीच माहिती होते. वडिलांना मात्र याची कोणतीही कल्पना नव्हती.