जालना : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका भरधाव ट्रॅव्हल्सने आयशर टेम्पोला पाठीमागून दिलेल्या भीषण धडकेमुळे दोघे गंभीर, तर चौघे किरकोळ जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी समृद्धी महामार्गावरील नागपूर कॅरिडॉरवरील केळी गव्हाण पांगरी शिवारात (चॅनल क्रमांक ३७७.४) घडली. विशेष म्हणजे अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समध्ये ४९ प्रवासी होते.
या भीषण अपघातात ट्रॅव्हल्स चालक अंकित कुशवाह (वय ३१) आणि नऊ वर्षांचा शौर्य पवन सिंग हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच मेघा लक्ष्मण पांडे (वय २६), खुशी चंद्रमोहन पांडे, नीलम पवन सिंग (वय ३० रा. रेवतीपूर, उत्तर प्रदेश) आणि चार वर्षीय चिमुकली पूर्वी पवन सिंग हे किरकोळ जखमी झाले आहेत. 'हर्ष ट्रॅव्हल्स' (एआर ११ सी ०३०६) नागपूरहून येत असताना चालकाने समोरील आयशर टेम्पोला (एमएच ०३ सीव्ही ३१०१) ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, वेगावर नियंत्रण न राहिल्याने बस पाठीमागून आयशरवर प्रचंड वेगाने आदळली. यात दोघे गंभीर, तर चौघे किरकोळ जखमी झाले. इतर ४३ प्रवासी या भीषण धडकेतून सुखरूप बचावले. अपघाताची भीषणता इतकी होती की, बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग विभागाचे पोलिस उपनिरीक्षक ए. के. काळे, हवालदार वसंत राठोड, केदारे, जयलाल सुंदरडे आणि एमएसएफच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. या अपघाताची चंदनझिरा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
Web Summary : A speeding travel bus collided with a tempo while overtaking on Samruddhi highway near Jalna. Two are seriously injured and four others sustained minor injuries. 43 passengers escaped unhurt. Police are investigating.
Web Summary : जालना के पास समृद्धि राजमार्ग पर ओवरटेक करते समय एक तेज रफ्तार ट्रैवल बस एक टेम्पो से टकरा गई। दो गंभीर रूप से घायल हैं और चार अन्य को मामूली चोटें आई हैं। 43 यात्री सुरक्षित बच गए। पुलिस जांच कर रही है।