१२६ शाळांची ऑनलाइन अहवालाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST2021-02-09T04:33:43+5:302021-02-09T04:33:43+5:30

जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू ...

Follow the online report of 126 schools | १२६ शाळांची ऑनलाइन अहवालाकडे पाठ

१२६ शाळांची ऑनलाइन अहवालाकडे पाठ

जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु जिल्ह्यातील १२६ शाळा अद्याप दैनंदिन ऑनलाइन अहवाल सादर करीत नसल्याचे चित्र आहे.

कोरोनातील सर्व सूचनांचे पालन करून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय दैनंदिन उपस्थिती, शिक्षकांच्या तपासण्या आदी माहितीही ऑनलाइन सादर करण्याच्या सक्त सूचना आहेत. ऑनलाइन अहवालाच्या पाहणीनंतर इतर उपाययोजना करणे वरिष्ठांना शक्य होते. परंतु जिल्ह्यातील १२६ शाळा ऑनलाइन अहवाल सादर करीत नाहीत. या शाळांमध्ये सर्वाधिक ११९ शाळा या जालना तालुक्यातीलच आहेत.

अहवाल न देण्याची कारणे

पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळांनी शाळा सुरू झाल्यानंतर दैनंदिन विद्यार्थ्यांची हजेरी, शिक्षकांची तपासणी, कोरोनाबाधित आदी विविध प्रकारची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु जिल्ह्यातील १२७ शाळांकडून अहवाल दिला जात नाही. विशेषत: ऑनलाइन अडचणी, अपुरे कर्मचारी आदी कारणे अहवाल न भरण्यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे.

३७ शिक्षकांसह पाच कर्मचारी कोरोनाबाधित

शाळा सुरू झाल्यानंतर शाळेतील शिक्षकांच्या टप्प्याटप्प्याने तपासण्या केल्या जात आहेत. या तपासण्यांमध्ये आजवर ३७ शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यात जालना तालुक्यातील १७, घनसावंगी-८, भोकरदन- ८ व जाफराबाद तालुक्यातील चार शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर जिल्ह्यातील पाच शिक्षकेतर कर्मचारीही कोरोनाबाधित झाले आहेत.

जिल्ह्यातील सर्व शाळांनी नियमित ऑनलाइन अहवाल भरावा याबाबत सूचना दिलेल्या आहेत. ज्या शाळा नियमित ऑनलाइन अहवाल भरणार नाहीत, अशा शाळांवर प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे. कोरोनातील सूचनांचे पालन करून शाळा सुरू आहेत.

- कैलास दातखीळ

शिक्षणाधिकारी, जालना

जिल्ह्यातील

शाळांची सद्य:स्थिती

पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा १८५८

सुरू झालेल्या शाळा १८५८

विद्यार्थिसंख्या

एकूण संख्या १,४७,४८३

उपस्थित विद्यार्थी ७८,८४३

अहवाल न देणाऱ्या तालुकानिहाय शाळा

जालना ११९

बदनापूर ००

अंबड ००

घनसावंगी ००

परतूर ०३

मंठा ००

भोकरदन ००

जाफराबाद ०४

Web Title: Follow the online report of 126 schools