अखेर जीवरेखा धरणातून पाणी सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST2021-02-09T04:33:14+5:302021-02-09T04:33:14+5:30

टेंभुर्णी- जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथील जीवरेखा धरणातून अखेर रविवारी सायंकाळी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. मुख्य कालव्याच्या गेटचा रॉड तुटल्याने ...

Finally, water was released from Jivarekha dam | अखेर जीवरेखा धरणातून पाणी सुटले

अखेर जीवरेखा धरणातून पाणी सुटले

टेंभुर्णी- जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथील जीवरेखा धरणातून अखेर रविवारी सायंकाळी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. मुख्य कालव्याच्या गेटचा रॉड तुटल्याने धरणातून पाणी सुटणार की नाही, याबाबत शेेतकऱ्यांत साशंकता निर्माण झाली होती. दरम्यान, रविवारी सायंकाळी या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून, ते सोमवारी टेंभुर्णीपर्यंत पोहोचले आहे. यामुळे परिसरातील शेतकरी सुखावले असून, आता रबी हंगामाच्या त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

यावर्षी जीवरेखा धरण तुडुंब भरल्याने परिसरातील अकोलादेव, टेंभुर्णी, गणेशपूर, सावंगी, पापळ, गोंधनखेडा आदी शिवारातील शेतकऱ्यांचा रबी हंगाम या पाण्यावर अवलंबून होता. मात्र, पहिले पाणी सुटल्यानंतर दुसरे पाणी सोडताना गेट नादुरुस्त झाल्याने शेतकऱ्यांसह पाटबंधारे विभाग चिंतित होता. याबाबत टेंभुर्णी येथील शेतकऱ्यांनी कालव्याचे पाणी सोडले नाही तर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान, पाटबंधारे विभागाने तातडीने या गेटची दुरुस्ती करून रबी हंगामासाठी दुसऱ्यांदा पाणी उपलब्ध करून दिले.

धरणाचे पाणी सुटले नसते तर कालवा परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा रबी हंगाम धोक्यात आला होता. पाटबंधारे विभागाने तातडीने गेटची दुरुस्ती केल्याने टेंभुर्णी येथील शेतकरी सर्जेराव शिंदे, रंगनाथ जमधडे, विष्णू जमधडे, दत्तू मुनेमाणिक, संतोष शिंदे, संजय सावंत, शंकर खोत, रामू मुळे आदींनी समाधान व्यक्त केले आहे.

चौकट

लोकमतने आवाज उठविला

कालव्याचे गेट नादुरुस्त झाल्यानंतर सर्वप्रथम हे वृत्त प्रकाशित करून लोकमतने शेतकऱ्यांच्या भावना संबंधित विभागापर्यंत पोहोचविल्या. शिवाय ‘धरणातील पाण्याअभावी रबी हंगाम धोक्यात’ हे वृत्त ही वारंवार प्रकाशित केले. लोकमतमुळेच आम्हा शेतकऱ्यांना खरा न्याय मिळाला. या पाण्याचा रबी हंगामासाठी मोठा फायदा होणार आहे.

संतोष शिंदे, शेतकरी, टेंभुर्णी.

फोटो

जीवरेखा धरणातील कालव्यातून टेंभुर्णीकडे झेपावलेल्या पाण्याचे अकोलादेवजवळ टिपलेले छायाचित्र.

Web Title: Finally, water was released from Jivarekha dam