वर्षभरानंतर होणार जिल्हा नियोजन समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST2021-02-06T04:56:16+5:302021-02-06T04:56:16+5:30

जिल्ह्याच्या विकासकामांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील बांधकाम, रस्ते, सिंचन, पशुसंवर्धन, शिक्षण तसेच अन्य ...

District Planning Committee meeting will be held later in the year | वर्षभरानंतर होणार जिल्हा नियोजन समितीची बैठक

वर्षभरानंतर होणार जिल्हा नियोजन समितीची बैठक

जिल्ह्याच्या विकासकामांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील बांधकाम, रस्ते, सिंचन, पशुसंवर्धन, शिक्षण तसेच अन्य महत्त्वपूर्ण विषयांवर सर्वच लोकप्रतिनिधी आढावा घेतात. ही बैठक पालकमंत्री तथा जिल्हा नियाेजन समितीचे अध्यक्ष राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. बैठकीस खा. तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ. कैलास गोरंट्याल, आ. संतोष दानवे, आ. राजेश राठोड, आ. बबनराव लोणीकर, आ. नारायण कुचे, आदींची उपस्थिती राहणार आहे. असे असले तरी सध्या संसदेचे हिवाळी अधिवशेन सुरू असल्याने रावसाहेब दानवेंची उपस्थिती राहण्याची शक्यता धूसर आहे.

चौकट

तरतूद वाढवून घेण्याचे नेत्यांसमोर आव्हान

गेल्या वर्षी जालना जिल्ह्याचा वार्षिक आराखडा हा २३५ कोटी रुपयांचा होता. तो यंदा १८१ कोटी रुपयांचा करण्यात आला आहे; परंतु या १८१ कोटींच्या आराखड्यात विभागीय नियोजन समितीच्या बैठकीत वाढवून घेण्याची गरज आहे. ही बैठक १३ तारखेस औरंगाबाद येथील आयुक्त कार्यालयात होणार आहे. त्यात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार असून, त्या बैठकीत जालन्याच्या विकास आराखड्यात वाढ करून घेण्याचे मोठे आव्हान खऱ्या अर्थाने पालकमंत्री टोपे यांच्या समोर राहणार आहे.

चौकट

एमबीबीएस महाविद्यालयावर चर्चेची शक्यता

जालना येथील प्रस्तावित शासकीय एमबीबीएस महाविद्यायाच्या मुद्द्यावर या नियोजन समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. केवळ जागा निश्चित न झाल्याने यंदा हे महाविद्यालय सुरू होणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे. हे महाविद्यालय व्हावे म्हणून आ. कैलास गोरंट्याल यांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी दोन जागांची पाहणी करून तसा अहवाल शासनाकडे सादर केला आहे; परंतु जागाच निश्चित न झाल्याने हा मुद्दा लांबणीवर पडला आहे. विशेष म्हणजे उस्मानाबाद येथील महाविद्यालयास मंजुरीही मिळून ते यंदाच्या शैक्षणिक वर्षात सुरू होणार आहे.

Web Title: District Planning Committee meeting will be held later in the year