अंबडमध्ये भरबाजारात फिल्मी स्टाईल लूट! सराफा व्यापाऱ्याच्या कारमधून ७ किलो चांदी चोरीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 12:17 IST2026-05-13T12:13:58+5:302026-05-13T12:17:47+5:30
अंबडमध्ये ७ किलो चांदीच्या दागिन्यांची बॅग लंपास, व्यापाऱ्यांमध्ये घबराट. सीसीटीव्हीत कैद झाले चोरटे.

अंबडमध्ये भरबाजारात फिल्मी स्टाईल लूट! सराफा व्यापाऱ्याच्या कारमधून ७ किलो चांदी चोरीस
अंबड (जि. जालना): अंबड शहरातील गजबजलेल्या सराफा बाजारात मंगळवारी (१२ मे) दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास चोरीची एक मोठी घटना घडली. छत्रपती संभाजीनगर येथून किरकोळ दागिने विक्रीसाठी आलेले सराफा व्यावसायिक मयूर सुरेश सुराणा यांची ७ किलो चांदीचे दागिने असलेली बॅग चोरट्यांनी पळवली आहे.
असा घडला प्रकार
व्यापारी मयूर सुराणा हे आपल्या कारमधून (क्रमांक MH 20 GQ 2595) दागिने विक्रीसाठी अंबडमध्ये आले होते. त्यांची कार सराफा बाजारात उभी असताना, मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी कारमधील दागिन्यांची बॅग शिताफीने लंपास केली. या बॅगेत ७ किलो चांदीचे दागिने होते, ज्याचे बाजार मूल्य १६ ते १७ लाख रुपये इतके आहे.
सराफा व्यापाऱ्याला चोरट्यांनी गाठले; अंबडमध्ये ७ किलो चांदीच्या दागिन्यांची बॅग लंपास, व्यापाऱ्यांमध्ये घबराट. #jalana#marathwadapic.twitter.com/SB4pVlbWpp
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) May 13, 2026
सीसीटीव्हीत चोरटे कैद
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. सीसीटीव्हीमध्ये हेल्मेट घातलेले आणि डोक्याला रुमाल बांधलेले दोन संशयित चोरटे बॅग घेऊन पसार होताना दिसत आहेत. या घटनेमुळे अंबडमधील व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.