खतरनाक जुगाड! पेट्रोल महागले, पठ्ठ्याने डिक्कीत सिलेंडर बसवून गॅसवर चालवलेली बाइक जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 17:24 IST2026-05-18T17:23:40+5:302026-05-18T17:24:35+5:30
दुचाकीच्या डिक्कीत वेल्डिंग करून बसवली गॅस टाकी; नाकाबंदीत पोलिसांकडून गाडी जप्त, चालक अटकेत.

खतरनाक जुगाड! पेट्रोल महागले, पठ्ठ्याने डिक्कीत सिलेंडर बसवून गॅसवर चालवलेली बाइक जप्त
भोकरदन (जि.जालना) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी सायंकाळच्या सुमारास भोकरदन पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता, स्वतःच्या व इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने दुचाकीच्या डिक्कीत चक्क वेल्डिंग करून एल.पी.जी. गॅसची टाकी बसवून ती गाडी रस्त्यावर धावताना पकडण्यात आली. याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी संशयास्पद दुचाकी जप्त केली असून चालकाला ताब्यात घेतले आहे.
पोलिस अधीक्षक तेघबीर सिंह संधू व उपविभागीय पोलिस अधिकारी कटेकर यांच्या आदेशानुसार १६ मे रोजी सायंकाळी ६:०० ते २२:०० वाजण्याच्या दरम्यान भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कडक नाकाबंदी करण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान पोलिस निरीक्षक किरण बिडवे व त्यांच्या पथकाला एक संशयास्पद हिरो होंडा दुचाकी (क्रमांक एमएच. २२. सी. ९५०७) येताना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवून तिची बारकाईने पाहणी केली असता, पोलिसही थक्क झाले. या दुचाकीच्या डिक्कीमध्ये हुबेहूब डिक्कीच्याच आकाराची एक नवीन वेल्डिंग केलेली गॅसची टाकी बसवण्यात आली होती. इतकेच नव्हे तर, त्या टाकीमधून एका प्लास्टिकच्या नळीद्वारे थेट दुचाकीच्या इंजिनला गॅसचा सप्लाय देण्यात आला होता.
जीवितास धोका निर्माण करणारे कृत्य
पोलिसांनी दुचाकी चालक मोहमंद अदिल शेख रफिक (वय २०, रा. नवे भोकरदन) याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्याने घरगुती एल.पी.जी. सिलिंडरमधील गॅस या विशेष टाकीमध्ये भरून, गाडीत बेकायदेशीर बदल करून ती गॅसवर चालवत असल्याची कबुली दिली. कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय केलेला हा जीवघेणा बदल रस्त्यावरील इतर वाहनधारक आणि स्वतः चालकासाठी एखादा धावत्या बॉम्बप्रमाणे ठरू शकला असता.
...यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, पवन राजपूत, भाऊसाहेब सहाणे, सहाय्यक फौजदार देशपांडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल मंडलिक, पोलिस नाईक जाधव, उबाळे, पोलिस कॉन्स्टेबल गवळी, शिंदे, मोरे, राणगोते आणि दांडगे यांच्या पथकाने केली.