इलॉन मस्क यांचे एक्स जागतिक स्तरावर ठप्प; महिनाभरात दुसऱ्यांदा तांत्रिक बिघाडामुळे सेवा खंडित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 20:33 IST2026-02-16T20:29:36+5:302026-02-16T20:33:44+5:30
इलॉन मस्क यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वी ट्विटर) जगभरात बंद आहे.

इलॉन मस्क यांचे एक्स जागतिक स्तरावर ठप्प; महिनाभरात दुसऱ्यांदा तांत्रिक बिघाडामुळे सेवा खंडित
X Down: सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज प्लॅटफॉर्म आणि इलॉन मस्क यांची मालकी असलेल्या एक्सला (पूर्वीचे ट्विटर) आज पुन्हा एकदा मोठ्या तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला. सोमवारी संध्याकाळी ७:१० च्या सुमारास अचानक एक्सची सेवा जगभरात विस्कळीत झाली. यामुळे भारत, अमेरिका, ब्रिटन आणि युरोपसह अनेक देशांतील लाखो युजर्सना हे अॅप आणि वेबसाइट वापरण्यात अडचणी येत आहेत.
नेमकी समस्या काय?
डाऊनडिटेक्टर या आउटेज ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, अवघ्या काही मिनिटांत ४५,००० हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या. मोबाईल अॅप उघडल्यावर कोणतीही पोस्ट दिसत नसून फक्त पांढरी किंवा काळी स्क्रीन दिसत असल्याची तक्रार युजर्सनी केली. तर फीड रिफ्रेश करण्याचा प्रयत्न केल्यास Something went wrong असा मेसेज येत आहे. युजर्सना नवीन पोस्ट करता येत नाहीयेत, तसेच जुन्या पोस्टही आपोआप गायब होत आहेत. मस्क यांच्या कंपनीचा चॅटबॉट ग्रोक देखील या आउटेजमुळे पूर्णपणे ठप झाला आहे.
महिनाभरात दुसऱ्यांदा मोठा फटका
२०२६ मधील ही एक्स डाऊन होण्याची दुसरी मोठी घटना आहे. यापूर्वी १६ जानेवारी २०२६ रोजी देखील भारत आणि अमेरिकेसह अनेक देशांत ७५ हजार युजर्सनी सेवा विस्कळीत झाल्याची तक्रार केली होती. वारंवार होणाऱ्या या तांत्रिक बिघाडामुळे प्लॅटफॉर्मच्या स्थिरतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
एक्सकडून अद्याप मौन
या आउटेजवर इलॉन मस्क किंवा एक्सच्या सपोर्ट टीमकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. सेवा कधीपर्यंत पूर्ववत होईल, याबाबत युजर्समध्ये संभ्रम आहे. दरम्यान, एक्सडाऊन झाल्यामुळे युजर्सनी फेसबुक, इंस्टाग्राम आणि थ्रेड्स सारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला प्रतिक्रिया दिल्या.
दरम्यान, ऑक्टोबर २०२२ मध्ये इलॉन मस्क यांनी ४४ बिलियन डॉलर्समध्ये ट्विटर खरेदी केल्यापासून कंपनीत मोठे फेरबदल झाले आहेत. पराग अग्रवाल यांच्यासह टॉप मॅनेजमेंटला हटवणे आणि मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करणे, या निर्णयांचा परिणाम प्लॅटफॉर्मच्या तांत्रिक क्षमतेवर होत असल्याची चर्चा आता पुन्हा एकदा रंगू लागली आहे.