युद्धानं डोकं बधीर, मनावर दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 08:44 IST2026-03-15T08:43:12+5:302026-03-15T08:44:11+5:30

युद्धामुळे निर्माण होणारी भीती, अनिश्चितता आणि असुरक्षिततेची भावना व्यक्तीच्या मनावर दीर्घकाळ टिकणारा परिणाम करू शकते.

War has a deafening effect on the head, and its effects on the mind | युद्धानं डोकं बधीर, मनावर दुष्परिणाम

युद्धानं डोकं बधीर, मनावर दुष्परिणाम

 

डॉ. ऋतुजा पाटील-कोळवले, मानसोपचार तज्ज्ञ, कोल्हापूर -

अमेरिका–इस्रायल आणि इराण संघर्षामुळे जागतिक स्तरावर अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. युद्धाचा परिणाम केवळ रणांगणापुरता मर्यादित राहत नाही; तर तो समाजाच्या मानसिक आरोग्यावरही खोलवर परिणाम करतो. विविध आंतरराष्ट्रीय अभ्यासांनुसार, युद्ध किंवा मोठ्या संघर्षाचा अनुभव घेतलेल्या सुमारे २२ टक्के लोकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या दिसून येतात. यामध्ये पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD), तीव्र चिंता, नैराश्य, बायपोलर डिसऑर्डर आणि स्किझोफ्रेनिया यांसारख्या विकारांचा धोका वाढतो. युद्धामुळे निर्माण होणारी भीती, अनिश्चितता आणि असुरक्षिततेची भावना व्यक्तीच्या मनावर दीर्घकाळ टिकणारा परिणाम करू शकते.

विशेषतः ज्या व्यक्तींना आधीपासूनच मानसिक आरोग्याशी संबंधित अडचणी आहेत, त्या व्यक्तींसाठी अशी परिस्थिती अधिक आव्हानात्मक ठरते. औषधे, समुपदेशन किंवा उपचारांमध्ये खंड पडल्यास त्यांची प्रकृती अधिक बिघडण्याची शक्यता असते. याशिवाय युद्धामुळे निर्माण होणारा आर्थिक ताण, त्यामुळे वाढत जाणारी महागाई, नोकरीची अनिश्चितता किंवा जागतिक बाजारातील चढ-उतार यांचाही मानसिक आरोग्यावर अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. 

सोशल मीडिया, इंटरनेटवरील माहितीही वाढवते ताण
आजच्या डिजिटल युगात युद्धाच्या परिणामांचा मानसिक पातळीवर प्रसार अधिक वेगाने होतो. सोशल मीडिया, न्यूज चॅनेल आणि इंटरनेटवरील सततच्या अपडेट्समुळे लोक सतत तणावपूर्ण माहितीच्या संपर्कात राहतात. बॉम्बस्फोट, विध्वंस आणि मानवी हानीची दृश्ये पाहताना अनेकांना अस्वस्थता, भीती किंवा असहायतेची भावना जाणवू लागते. या सततच्या माहितीच्या माऱ्यामुळे मनावर ताण साचत जातो.

काय करू शकतो?
बातम्यांचा मर्यादित वापर : नकारात्मक, भडकाऊ किंवा अवास्तव बातम्यांपासून स्वतःला दूर ठेवणे. विश्वासार्ह स्रोतांकडून आवश्यक तितकीच माहिती घेणे. मुलांसाठी सुरक्षित वातावरण : खेळ, छंद जोपासणे. युद्धाबद्दलचे गैरसमज दूर करणे आणि भावनिक आधार देणे. सामाजिक आधार : एकमेकांना ऐकून घेणे, सहानुभूती देणे, सत्य आणि योग्य बातम्या सांगणे. तज्ज्ञांचा सल्ला : युद्ध संपले तरी त्याच्या मानसिक जखमा बराच काळ राहतात. त्यामुळे समाज म्हणून मानसिक आरोग्याची पुनर्बांधणी करणे हे महत्त्वाचे आहे.

अफवांवर विश्वास नको 
युद्धाबाबतच्या अफवा, अपूर्ण माहिती किंवा भडक चर्चांमुळे असुरक्षितता वाढते. लोकांच्या भावनिक स्थैर्यावर परिणाम होतो, सामाजिक संवादातही तणाव वाढू शकतो. युद्धाचे परिणाम केवळ राजकीय, सामरिक किंवा आर्थिक नसून मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही ते दीर्घकालीन असतात. 

दुष्परिणाम काय?
भीती किंवा असुरक्षतेची भावना : सतत युद्धाच्या बातम्या पाहिल्याने लोकांमध्ये भीती, भविष्याबद्दल चिंता वाढू शकते. लहान मुले, संवेदनशील व्यक्तींवर याचा जास्त परिणाम होऊ शकतो.
नैराश्य : ह्रदयद्रावक दृश्यांमुळे नैराश्य वाढू शकते. झोप न लागणे, चिडचिड, कामात लक्ष न लागणे अशी लक्षणे दिसू शकतात.
पॅनिक खरेदी : भविष्याच्या चिंतेतून नागरिक जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ताणतणाव वाढतो. उदा. गॅस सिलिंडरसाठी रांगा लावणे.
आघातानंतरचा ताण :  युद्ध अनुभवलेल्या अनेक लोकांना नंतर मानसिक त्रास जाणवू शकतो. भयानक आठवणी येणे, चित्र दिसणे, अचानक घाबरून उठणे, दचकणे, भावनिक सुन्नपणा वाटणे अशी लक्षणे दिसतात. 
असहाय्यतेची भावना : युद्धाच्या काळात अनेक लोकांना स्वतःकडे कोणतेही नियंत्रण नसल्यासारखे वाटते. आपण काहीच करू शकत नाही, अशी असहायतेची भावना निर्माण होते. त्यातून नैराश्य, चिंता वाढू शकते.
मुलांवर होणारे परिणाम : भीती, रडारड, कन्फ्युजन होऊ शकते. 

Web Title : युद्ध का प्रभाव: चिंता, मानसिक स्वास्थ्य जोखिम, और सामाजिक प्रभाव

Web Summary : युद्ध मानसिक स्वास्थ्य पर गहरा प्रभाव डालता है, जिससे PTSD, चिंता और अवसाद होता है। लगातार मीडिया एक्सपोजर तनाव को बढ़ाता है। समाचारों का सेवन सीमित करें, बच्चों का समर्थन करें, विशेषज्ञ सलाह लें और अफवाहों से बचें। डर, लाचारी और पैनिक खरीदारी आम प्रतिक्रियाएं हैं, जिसके लिए मानसिक स्वास्थ्य सुधार की आवश्यकता है।

Web Title : War's Impact: Anxiety, Mental Health Risks, and Societal Effects

Web Summary : War profoundly impacts mental health, causing PTSD, anxiety, and depression. Constant media exposure amplifies stress. Limit news intake, support children, seek expert advice, and avoid rumors. Fear, helplessness, and panic buying are common reactions, demanding mental health recovery.

टॅग्स :Warयुद्ध