...तर तुमच्यावर निर्बंध लावू, संतप्त अमेरिकेची अल्जेरियाला थेट धमकी; भारताचे टेन्शन का वाढलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:48 IST2026-02-05T10:44:49+5:302026-02-05T10:48:51+5:30
अल्जेरियाने मागील वर्षी रशियासोबत त्यांचे लढाऊ विमान SU-57 खरेदी करण्याची पुष्टी केली होती. अल्जेरिया रशियाच्या SU-57 या लढाऊ विमानाचा पहिला परदेशी ग्राहक देश बनला होता.

...तर तुमच्यावर निर्बंध लावू, संतप्त अमेरिकेची अल्जेरियाला थेट धमकी; भारताचे टेन्शन का वाढलं?
अल्जेरियाकडून रशियाच्या SU-57 फायटर जेट खरेदीच्या रिपोर्टनंतर अमेरिकेने चिंता व्यक्त करत संतप्त भूमिका मांडली आहे. अमेरिकेने या डीलमुळे सर्वात मोठा आफ्रिकन देश अल्जेरियाविरोधात कठोर निर्बंध आणण्याची तयारी केली आहे. सुखोई ५७ खरेदी केल्यास अल्जेरियावर CAATSA अंतर्गत निर्बंध लादण्यात येतील असं अमेरिकन परराष्ट्र विभागाचे ब्यूरो ऑफ ईस्टर्न अफेयर्सचे प्रमुख रॉबर्ट पॅलाडिनो यांनी म्हटलं आहे. SU-57 रशियाचे अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. ज्यावर भारतासह अनेक देशांची नजर आहे. परंतु रशियासोबत डील करणाऱ्या देशांविरोधात कठोर पाऊले उचलणार असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारतासमोरच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे.
रॉबर्ट पॅलाडिनो यांनी सांगितले की, अल्जेरिया रशियाकडून सैन्य साहित्य खरेदी करण्याची बातमी ही अमेरिकन प्रशासनासाठी चिंतेचा विषय आहे. अल्जेरिया सरकारसोबत आम्ही अनेक मुद्द्यांवर एकत्र काम करत आहोत. परंतु काही विषयांवर आमच्यात गंभीर मतभेद आहेत. शस्त्रांचा व्यवहार हादेखील मतभेदाचा मुद्दा आहे. सध्या अमेरिकेने चर्चेतून तोडगा काढण्यावर भर दिला आहे परंतु आवश्यकता भासल्यास आम्ही CAATSA लागू करून हा करार थांबवू शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अल्जेरियाने मागील वर्षी केला होता करार
अल्जेरियाने मागील वर्षी रशियासोबत त्यांचे लढाऊ विमान SU-57 खरेदी करण्याची पुष्टी केली होती. अल्जेरिया रशियाच्या SU-57 या लढाऊ विमानाचा पहिला परदेशी ग्राहक देश बनला होता. रशियाने अल्जेरियाला एडवांस्ड फायटर जेट पुरवठा करण्याची तयारी केली आहे. या वर्षाच्या अखेरीस या विमानाची डिलीवरी होणार आहे. सध्या अल्जेरियातील पायलट रशियाकडून हे विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. SU-57 लढाऊ विमान रशियाच्या सुखोई डिझाईन ब्यूरोने विकसित केले आहे. या विमानाने २०१० मध्ये त्याचे पहिले उड्डाण घेतले आणि याची पहिली तुकडी २०२० मध्ये रशियन सैन्यात समाविष्ट झाली. रशियाचे सुखोई SU-57 फेलॉन हे पाचव्या पिढीतील विमान आहे. याने अलीकडेच अमेरिका, फ्रान्स आणि चीनच्या जागतिक बाजाराला मोठे आव्हान दिले आहे.
भारताचेही रशियाच्या SU-57 विमानावर लक्ष
भारतासाठी रशिया शस्त्र पुरवठा करणारा सर्वात विश्वासू देश आहे. रशियाच्या SU-57 खरेदीवर भारतही विचार करत आहे. भारताच्या हवाई दलाला अत्याधुनिक लढाऊ विमानाची अत्यंत गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी विविध पर्यायांवर भारत विचार करत आहेत त्यातील महत्वाचा पर्याय रशियाचे SU-57 लढाऊ विमान खरेदी आहे. भारताची नजर रशियाच्या सुखोई SU-57 वर आहे परंतु अमेरिकेसोबत संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात भारतासाठी हा व्यवहार सोपा नाही. अल्जेरियाबाबत अमेरिकेने घेतलेली भूमिका पाहता भारताने जर रशियाशी या विमानाचा व्यवहार केला तर अमेरिका नाराज होणार हे स्पष्ट झाले आहे.