ट्रम्पविरोधात याचिका कोणी दाखल केलेली? टेरिफवर भलेभले उद्योगपती गप्प बसलेले, एका खेळण्याच्या व्यापाऱ्याने...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 12:24 IST2026-02-21T12:22:22+5:302026-02-21T12:24:19+5:30
Toy merchant vs Trump US Tariff Case : शिकागोच्या 'लर्निंग रिसोर्सेस'चे सीईओ रिक वोल्डेनबर्ग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाविरुद्ध कायदेशीर लढाई जिंकली आहे. वाचा त्यांच्या संघर्षाची संपूर्ण कथा.

ट्रम्पविरोधात याचिका कोणी दाखल केलेली? टेरिफवर भलेभले उद्योगपती गप्प बसलेले, एका खेळण्याच्या व्यापाऱ्याने...
वॉशिंग्टन: जेव्हा अमेरिकेतील मोठे उद्योगपती गप्प होते, तेव्हा एका खेळण्यांच्या व्यापाऱ्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ' धोरणाविरुद्ध थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. रिक वोल्डेनबर्ग असे या धाडसी व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या याचिकेमुळे अमेरिकेतील छोटे आणि मध्यम उद्योग क्षेत्रात सध्या त्यांची मोठी चर्चा होत आहे.
ट्रम्प यांच्या टॅरिफला नडले! कोण आहेत भारतीय वंशाचे नील कत्याल, ज्यांच्यामुळे अमेरिकन सुप्रीम कोर्टाने टॅरिफ रद्द केले?
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
या याचिकेवर वोल्डेनबर्ग यांच्या वतीने भारतीय वंशाचे वकील नील कत्याल हे लढले आणि जिंकले. परंतू, जर वोल्डेनबर्ग यांनी याचिकाच दाखल केली नसती तर आज ट्रम्प यांना जरब बसली नसती. भले भले उद्योगपती, व्यापारी ट्रम्प यांच्या या व्यापार नितीविरोधात चिडीचूप बसलेले असताना वोल्डेनबर्ग यांनी धाडस केले आणि ट्रम्प यांचे कंबरडे मोडले आहे.
रिक वोल्डेनबर्ग नेमके कोण आहेत?
रिक वोल्डेनबर्ग हे शिकागो जवळील 'लर्निंग रिसोर्सेस' या शैक्षणिक खेळणी बनवणाऱ्या कंपनीचे सीईओ आहेत. ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या 'लिबरेशन डे' टॅरिफ धोरणामुळे त्यांच्या व्यवसायावर थेट परिणाम झाला होता. विशेषतः परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या खेळण्यांच्या कच्च्या मालावर आणि तयार वस्तूंवर लावण्यात आलेल्या भरमसाठ शुल्कामुळे त्यांचे व्यावसायिक गणित कोलमडले होते.
न्यायालयीन लढाईचा मुख्य मुद्दा
वोल्डेनबर्ग यांनी केवळ आपल्या कंपनीसाठी नव्हे, तर अमेरिकेतील हजारो छोट्या उद्योजकांसाठी हा लढा दिला. त्यांचा मुख्य युक्तिवाद असा होता की, टॅरिफ धोरणामुळे मोठ्या कंपन्या टिकू शकतात, पण छोट्या आणि मध्यम कंपन्यांवर याचा प्रचंड आर्थिक भार पडतो. आयात शुल्कामुळे खेळण्यांच्या किमती वाढतील आणि पालकांवर त्याचा मोठा बोजा पडेल. राष्ट्राध्यक्षांनी काँग्रेसच्या (संसद) संमतीशिवाय अशा प्रकारे कर लादणे हे कायद्याचे उल्लंघन आहे.
छोट्या उद्योगांचे 'चेहरा' बनले
वोल्डेनबर्ग यांच्या या लढ्यामुळे त्यांना अमेरिकन व्यापारी वर्गात मोठी प्रतिष्ठा मिळाली आहे. नील कत्याल यांनी कायदेशीर बाजू मांडली असली, तरी या प्रकरणाला खऱ्या अर्थाने ताकद वोल्डेनबर्ग यांच्या याचिकेमुळे मिळाली. या ऐतिहासिक विजयानंतर अमेरिकन सुप्रीम कोर्टाने ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण रद्द केले असून, हा वोल्डेनबर्ग आणि त्यांच्यासारख्या अनेक व्यापाऱ्यांचा मोठा विजय मानला जात आहे.