इजिप्तमध्ये आढळले 2000 वर्षे जुने तमिळ-ब्राह्मी शिलालेख; प्राचीन इतिहासाची पाने उलगडणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 17:36 IST2026-02-13T17:34:41+5:302026-02-13T17:36:56+5:30
Tamil Brahmi inscriptions: कोण होता 'तो' पहिला भारतीय, ज्याचे नाव कबरींवर कोरलेले...?

इजिप्तमध्ये आढळले 2000 वर्षे जुने तमिळ-ब्राह्मी शिलालेख; प्राचीन इतिहासाची पाने उलगडणार...
Tamil Brahmi inscriptions: प्राचीन भारताच्या सागरी इतिहासाला नवे वळण देणारा एक महत्त्वाचा शोध समोर आला आहे. संशोधकांना इजिप्तमधील व्हॅली ऑफ द किंग्स येथील अत्यंत सुरक्षित अशा राजघराण्यांच्या कबरींमध्ये सुमारे 2,000 वर्षे जुने तमिळ-ब्राह्मी शिलालेख आढळले आहेत. या शोधामुळे प्राचीन तमिळ व्यापारी केवळ किनारी बंदरांपुरते मर्यादित नव्हते, तर ते इजिप्तच्या अंतर्गत भागातही प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आंतरराष्ट्रीय परिषदेत शोध सादर
हा ऐतिहासिक शोध स्वित्झर्लंडमधील लॉझान विद्यापीठाचे प्रा. इंगो स्ट्रॉख यांनी 11 फेब्रुवारी रोजी येथे सुरू झालेल्या चार दिवसीय आंतरराष्ट्रीय तमिळ शिलालेख परिषदेत सादर केला. ही परिषद तमिळनाडू राज्य पुरातत्त्व विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.
कबरींमध्ये तमिळ-ब्राह्मी आणि प्राकृत लेख...
प्रा. इंगो स्ट्रॉख आणि पॅरिसच्या फ्रेंच स्कूल ऑफ एशियन स्टडीजच्या प्रा. शार्लोट श्मिड यांनी संयुक्त संशोधनातून सहा दगडी कबरींमध्ये एकूण 30 शिलालेख सापडले असून 20 तमिळ भाषेत, तर उर्वरित संस्कृत, प्राकृत आणि गांधारी-खरोष्ठी लिपीत आहेत. यावरून त्या काळात गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर-पश्चिम भारतातील लोकही मिसरला प्रवास करत असल्याचे संकेत मिळतात.
पश्चिम भारताचा दूत मिसरमध्ये
एका संस्कृत शिलालेखात पश्चिम भारतातील ‘क्षहरात’ वंशाच्या एका दूताचा उल्लेख आहे, जो पहिल्या शतकात (इ.स.) इजिप्तमध्ये पोहोचला होता. याआधी फक्त रोमन व्यापारी भारतात येत असल्याची धारणा होती. मात्र, या शोधामुळे भारतीय व्यापारी रोमन आणि इजिप्त साम्राज्यांपर्यंत सक्रियपणे प्रवास करत असल्याचे निर्विवादपणे सिद्ध झाले आहे
‘तो आला आणि पाहिले’, तमिळ शैलीतील लेख
या संशोधनातील सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे ‘Cikai Korran’ (सिकै कोर्रन) हे नाव, जे तब्बल आठ वेगवेगळ्या ठिकाणी आढळले आहे. संशोधकांच्या मते, एका शिलालेखात स्पष्टपणे ‘Cikai Korran vara kanta’ असे लिहिले असून त्याचा अर्थ ‘सिकै कोर्रन आला आणि पाहिले’ असा होतो. हा मजकूर ग्रीक पर्यटकांनी त्या परिसरात कोरलेल्या ‘टुरिस्ट ग्राफिटी’सारखाच आहे, हे विशेष.
तमिळ व्यापारी केवळ खलाशी नव्हते
प्रा. स्ट्रॉख यांनी सांगितले की, आतापर्यंत इजिप्तमधील तमिळ उपस्थितीचे पुरावे बेरेनाईकसारख्या बंदरांपुरते मर्यादित होते. मात्र, हे शिलालेख सिद्ध करतात की, भारतीय (तमिळ) व्यापारी दीर्घकाळ इजिप्तमध्ये वास्तव्यास होते आणि त्यांनी किनाऱ्यापासून दूर असलेल्या ऐतिहासिक स्थळांनाही भेटी दिल्या होत्या.
‘सिकै कोर्रन’, उच्च दर्जाचा व्यापारी नेता?
संशोधकांच्या मते, ‘सिकै’ म्हणजे केसांचा शेंडा किंवा मुकुट आणि ‘कोर्रन’ म्हणजे नेता. या नावावरून संबंधित व्यक्ती प्राचीन व्यापारी संघटनांमधील प्रभावी आणि उच्च दर्जाचा नेता असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
परिषदेचे उद्घाटन आणि महत्त्व
या परिषदेचे उद्घाटन तमिळनाडूचे वित्त व पुरातत्त्व मंत्री थंगम तेन्नरसु यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी सांगितले की, शिलालेख हे समाजाचा कालानुक्रमिक आणि विश्वासार्ह इतिहास सांगतात, कारण नंतरच्या साहित्यिक लिखाणात आढळणाऱ्या भेसळीपासून ते मुक्त असतात. त्यांनी हेही नमूद केले की, भारतामधील सुमारे 30 हजार नोंदवलेल्या शिलालेखांपैकी मोठा वाटा तमिळनाडूमध्ये आहे, ज्यामुळे इ.स.पू. सहाव्या शतकापासूनचा अखंड इतिहास उपलब्ध होतो.
पुढील कार्यक्रम
ही परिषद 14 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, प्राचीन जलव्यवस्थापनावर आधारित ग्रंथाचे प्रकाशन, वीरशिळा, व्यापारी संघटनांचे अभिलेख आणि राज्यातील पुरातत्त्व स्थळांचे डिजिटल मॅपिंग यासारख्या विषयांवर सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.