Social Media: 16 वर्षाखाली मुलांचे इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंट बंद होणार, मेटाने ऑस्ट्रेलियासाठी का घेतला निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 14:22 IST2025-11-20T14:19:30+5:302025-11-20T14:22:27+5:30
Instagram Facebook Australia: इन्स्टाग्राम आणि फेसबुकची प्रमुख कंपनी असलेल्या मेटाने ऑस्ट्रेलियामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १६ वर्षाखालील मुलांचे अकाऊंट ४ डिसेंबरपासून बंद करण्यात येणार आहेत.

Social Media: 16 वर्षाखाली मुलांचे इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंट बंद होणार, मेटाने ऑस्ट्रेलियासाठी का घेतला निर्णय?
लहान मुलांना सोशल मीडियाची अतिरेकी सवय लागत असून, ऑस्ट्रेलिया सरकारने यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया सरकारचा निर्णय येण्याच्या आधीच मेटाने १६ वर्षाखालील मुलांचे अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ डिसेंबरला इन्स्टाग्राम आणि फेसबुक असलेले सगळे अकाऊंट बंद होणार आहेत.
इन्स्टाग्राम आणि फेसबुकची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाने या निर्णयाची घोषणा केली आहे. मेटाने २० नोव्हेंबर रोजी याबद्दल माहिती दिली. ऑस्ट्रेलिया सरकार लहान मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी कायदा लागू करण्याच्या तयारीत असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे.
फेकबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉकसह सोशल मीडियावरील यूजर्स हटवणार
१० डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील १६ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या यूजर्सची खाती बंद करण्याचा कायदा लागू केला जाणार आहे. जर या कंपन्यांनी १६ वर्षाखालील मुलांची खाती हटवली नाही, तर त्यांना मोठा दंड भरावा लागणार आहे.
मेटाने काय म्हटले आहे?
१६ वर्षाखाली मुलांचे अकाऊंट हटवण्याबद्दल मेटाने म्हटले आहे की, बंदी लागू होण्यापूर्वीच मेटा आपल्या प्लॅटफॉर्मवरून अकाऊंट हटवण्यास सुरूवात करणार आहे. आजपासून मेटा १३ ते १५ वर्ष वयोगटातील यूजर्संना आम्ही सूचना देण्यास सुरूवात करणार आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि थ्रेड्सवरील वापर या यूजर्संना करता येणार नाही.
४ डिसेंबरपासून १६ वर्षाखालील यूजर्संची खाती ब्लॉक करणे सुरू केले जाईल आणि सध्या अस्तित्वात असलेल्या खात्यांना दिलेली परवानगी रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू होईल. १० डिसेंबरपर्यंत १६ वर्षाखालील सर्व खाती हटवण्यात येतील, अशी आशा आहे, अशी माहिती मेटाने दिली आहे.
इन्स्टाग्रामवर ३,५०,००० खाती
सरकारच्या आकडेवारीनुसार, ऑस्ट्रेलियात १३ ते १५ वर्ष वयोगटातील ३,५०,००० यूजर्स इन्स्टाग्रामवर आहे. १,५०,००० यूजर्स फेसबुकवर आहेत. जी खाती चुकीने १६ वर्षाखालील म्हणून बंद केली जातील, असे यूजर्स व्हिडीओ सेल्फी किंवा सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र दाखवून वय पडताळणी करू शकतील आणि त्यांचे अकाऊंट पुन्हा सुरू केले जाईल.
ऑस्ट्रेलियामध्ये सरकार आणत असलेल्या कायद्याचा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने भंग केला, तर त्या कंपनीला ४९.५ मिलियन डॉलर दंड भरावा लागणार आहे.