पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 14:08 IST2026-05-04T14:08:05+5:302026-05-04T14:08:23+5:30
अमेरिकन नाकेबंदी दरम्यान पाकिस्तान इराणसाठी मोठा आधार ठरला आहे. पाकिस्तानने आपली बंदरे इराणच्या व्यापारासाठी खुली केली असून त्यातून मोठी कमाई सुरू केली आहे.

पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
एकीकडे इराणवर अमेरिकेने कडक समुद्री नाकेबंदी केली आहे आणि दुसरीकडे संयुक्त अरब अमिरातीशी असलेले संबंध ताणले गेले आहेत. अशा दुहेरी पेचात अडकलेल्या इराणला आता शेजारील पाकिस्तानने मोठा आधार दिला आहे. या मदतीच्या बदल्यात पाकिस्ताननेही स्वतःचा धंदा सेट केला असून, इराणच्या मालाची ने-आण करून पाकिस्तान आता बक्कळ कमाई करत आहे.
इराणची 'लाईफलाईन' बनली पाकिस्तानी बंदरे
युद्ध सुरू होण्यापूर्वी इराण आपला बहुतांश व्यापार यूएईच्या 'जेबेल अली' बंदरातून करत असे. मात्र, बदलत्या परिस्थितीत इराणसाठी ती दारे बंद झाली आहेत. अशा वेळी पाकिस्तानने आपले कराची, पोर्ट कासिम आणि ग्वादर ही तीन प्रमुख बंदरे इराणच्या व्यापारासाठी खुली केली आहेत. पाकिस्तानच्या वाणिज्य मंत्रालयाने २५ एप्रिल रोजी याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला असून २००८ पासून धूळ खात पडलेला व्यापार करार आता सक्रिय केला आहे.
वेळेची अन् पैशांची मोठी बचत
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ग्वादर-गब्द' हा मार्ग इराणसाठी सर्वात फायदेशीर ठरत आहे. या मार्गामुळे इराणच्या सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ अवघ्या २-३ तासांवर आला आहे. विशेष म्हणजे, कराचीमार्गे माल पाठवण्याच्या तुलनेत या नवीन मार्गामुळे वाहतूक खर्चात तब्बल ४५ ते ५५ टक्क्यांची बचत होत आहे. इराणचा माल इथून जात असल्याने ट्रान्झिट फी आणि इतर शुल्काच्या माध्यमातून पाकिस्तानच्या तिजोरीत कोट्यवधी रुपये जमा होत आहेत.
कराची बंदर ठरतंय गेमचेंजर!
जेव्हापासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, तेव्हापासून इराणकडे वळणाऱ्या एकूण कार्गोपैकी ७५ टक्के वाटा एकट्या कराची बंदराने हाताळला आहे. कराची आणि पोर्ट कासिममध्ये दरवर्षी ४२ दशलक्ष टन माल हाताळण्याची क्षमता असून, आता ही क्षमता पूर्णपणे वापरली जात आहे. चीनने विकसित केलेले ग्वादर बंदरही या शर्यतीत आघाडीवर असून ते इराणच्या चाबहार बंदरापासून अवघ्या १७० किमी अंतरावर असल्याने इराणला मोठा दिलासा मिळाला आहे.
अमेरिकेच्या नाकेबंदीला पाकिस्तानचा 'खो'
वॉशिंग्टनने इराणला जागतिक व्यापारापासून तोडण्यासाठी समुद्रात कडक पहारा लावला असताना, पाकिस्तानने जमिनी आणि पर्यायी समुद्री मार्गाने इराणचा माल बाहेर काढण्यास मदत केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या अलीकडील पाकिस्तान दौऱ्यात या व्यावसायिक भागीदारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. एकीकडे जगाचे लक्ष युद्धावर असताना पाकिस्तानने मात्र मध्यस्थ बनून आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा मोठा डाव यशस्वीपणे टाकला आहे.