समोरून मैत्री, पाठीमागून वार! ऑपरेशन एपिक फ्युरीमागे सौदीच्या प्रिन्सचा हात; ट्रम्प यांना हल्ल्यासाठी फूस लावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 20:56 IST2026-03-02T20:53:26+5:302026-03-02T20:56:22+5:30
Saudi Prince Iran Strike: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर आता मुस्लिम जगतात खळबळ उडवून देणारा एक ...

समोरून मैत्री, पाठीमागून वार! ऑपरेशन एपिक फ्युरीमागे सौदीच्या प्रिन्सचा हात; ट्रम्प यांना हल्ल्यासाठी फूस लावली
Saudi Prince Iran Strike:इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर आता मुस्लिम जगतात खळबळ उडवून देणारा एक मोठा खुलासा झाला आहे. इराणवर झालेल्या अमेरिकन हल्ल्यामागे केवळ इस्त्रायलचा दबाव नव्हता, तर सौदी अरबचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनीच डोनाल्ड ट्रम्प यांना या युद्धासाठी तयार केल्याचे समोर आले आहे. या दाव्यामुळे इस्लामिक देशांच्या राजकारणात भूकंप आला आहे.
पडद्यामागे डबल गेम
गेल्या २-३ वर्षांपासून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मध्यस्थीमुळे इराण आणि सौदी अरबमधील संबंध सुधारल्याचे चित्र जगाला दिसत होते. मात्र, पडद्यामागे चित्र काही वेगळेच होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, मोहम्मद बिन सलमान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना अनेकदा प्रायव्हेट कॉल करून इराणवर लष्करी कारवाई करण्यासाठी लॉबिंग केली. ट्रम्प हे सुरुवातीला राजनैतिक तोडगा काढण्याच्या विचारात होते, पण मोहम्मद बिन सलमान आणि नेतान्याहू यांच्या दबावामुळे त्यांनी इराणवर थेट हल्ल्याचा निर्णय घेतला.
'ऑपरेशन एपिक फ्युरी' आणि सत्तेचे समीकरण
अमेरिकेने या मोहिमेला ऑपरेशन एपिक फ्युरी असे नाव दिले आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश केवळ लष्करी तळ उद्ध्वस्त करणे हा नसून, इराणमध्ये सत्तापालट करणे आणि खामेनी यांना संपवणे हाच होता. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी आश्वासन दिले की, हा हल्ला इराक युद्धासारखा वर्षानुवर्षे चालणारा नसेल, तर तो अत्यंत वेगवान आणि निर्णायक असेल.
सौदीने ट्रम्प यांना दिले आश्वासन
इराणला केवळ लष्करी ताकदीनेच रोखले जाऊ शकते, अन्यथा तो अधिक शक्तिशाली होईल, असे सौदीने ट्रम्प यांना पटवून दिले. जर इराणने पलटवार केला आणि सुरक्षा धोक्यात आली, तर सौदी अरब जगाला होणारा तेल पुरवठा विस्कळीत होऊ देणार नाही, अशी खात्री ट्रम्प यांना देण्यात आली. मोहम्मद बिन सलमान यांनी ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांच्याशी असलेल्या आपल्या घनिष्ठ संबंधांचा वापर करून व्हाईट हाऊसमध्ये इराणविरोधी भूमिका भक्कम केली.
गुप्तचर यंत्रणांचा अहवाल धुडकावला
धक्कादायक बाब म्हणजे, अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या मते इराणकडून अमेरिकेला कोणताही तात्काळ धोका नव्हता. असे असतानाही, केवळ इस्त्रायल आणि सौदी अरब या दोन मित्रांच्या दबावाखाली येऊन ट्रम्प यांनी फायनल कॉल घेतला आणि खामेनी यांचा खात्मा झाला.