"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 08:51 IST2025-06-22T08:35:50+5:302025-06-22T08:51:56+5:30
इराणवरील अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांनंतर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक केले.

(फोटो सौजन्य - AP)
Iran Israel War: गेल्या १० दिवसांपासून सुरु असलेल्या इराण आणि इस्रायल युद्धात आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे. इस्रायलने मदत मागितल्यानंतर अमेरिकेने इराणवर हल्ला केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इराणमध्ये घुसून त्यांच्या तीन अणुऊर्जा प्रकल्पांवर जोरदार हवाई हल्ला केला. इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन प्रमुख अणु तळांवर हवाई हल्ले केले आहेत. त्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.
अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रावर हल्ला केल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. अमेरिकन सैन्याने इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान या तीन अणुस्थळांवर यशस्वी हल्ला केला असून सर्व विमान सुरक्षितपणे इराणच्या हद्दीतून बाहेर पडली आणि आपापल्या ठिकाणी पोहचल्याचे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक केले आहे. अमेरिकेने ताकदीने काम केले आहे आणि शांतता प्रस्थापित करण्याचा हाच खरा मार्ग आहे, असं बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे.
"अमेरिका खरोखरच अद्वितीय आहे. त्यांनी असं काही केलं आहे जे पृथ्वीवरील इतर कोणताही देश करू शकत नाही. इतिहासात नोंद आहे की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जगातील सर्वात धोकादायक राजवट, जगातील सर्वात धोकादायक शस्त्रे संपवण्याचे काम केले," असं नेतन्याहू यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं.
"राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि मी नेहमी म्हणतो की,'शांतता शक्तीतून येते. आधी ताकद दाखवली जाते, नंतर शांतता येते,' आज रात्री, ट्रम्प आणि अमेरिकेने पूर्ण ताकदीने त्यांचे काम केले आहे," असं म्हणत नेतन्याहू यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे लष्करी कारवाईबद्दल अभिनंदन केले आणि त्यांचे आभार मानले.
President Trump and I often say: ‘Peace through strength.’
— Benjamin Netanyahu - בנימין נתניהו (@netanyahu) June 22, 2025
First comes strength, then comes peace.
And tonight, @realDonaldTrump and the United States acted with a lot of strength. pic.twitter.com/7lTWCZkgw7
दरम्यान, अमेरिकेच्या लष्करी कारवाईबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी आनंद व्यक्त करत सैनिकांचे अभिनंदन केले. "लष्करी कारवाई केल्यानंतर अमेरिकन सैन्य सुरक्षितपणे अमेरिकेत परतत आहे. आपल्या महान अमेरिकन योद्ध्यांचे अभिनंदन. जगात असे दुसरे कोणतेही सैन्य नाही जे हे करू शकले असते. आता शांततेची वेळ आली आहे! या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद," असं ट्रम्प यांनी म्हटलं.