इराण-अमेरिका युद्धाचे ढग! 'मिशन आर्माडा', महासत्तेचा इराणभोवती अभेद्य लष्करी वेढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 05:40 IST2026-02-24T05:39:23+5:302026-02-24T05:40:19+5:30

अमेरिकेशी चर्चा करण्यास इराण तयार, मात्र लष्करी हल्ल्याला चोख उत्तर देण्याचा इशारा; शक्य तेवढ्या लवकर इराण सोडा, भारतीय दूतावासाचे भारतीय नागरिकांना आवाहन

Iran-US war clouds! 'Mission Armada', superpower's impenetrable military siege around Iran | इराण-अमेरिका युद्धाचे ढग! 'मिशन आर्माडा', महासत्तेचा इराणभोवती अभेद्य लष्करी वेढा

इराण-अमेरिका युद्धाचे ढग! 'मिशन आर्माडा', महासत्तेचा इराणभोवती अभेद्य लष्करी वेढा

तेहरान/जिनिव्हा : अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेची तिसरी फेरी गुरुवारी जिनिव्हामध्ये होणार असतानाच, अमेरिकेने लष्करी कारवाई केल्यास आम्ही स्वसंरक्षणासाठी मागे हटणार नाही, असा इशारा तेहरानने दिला आहे. 

गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने अमेरिकेशी करार केला नाही तर त्यांच्यावर मर्यादित स्वरुपाचा लष्करी हल्ल्याचा विचार करत असल्याचे विधान केले होते. 

त्या विधानावर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचा कोणत्याही स्वरुपाचा हल्ला तो मर्यादित स्वरुपाचा असला तरी ते अमेरिकेचे आक्रमण समजले जाईल, असे म्हटले आहे. 

आम्ही कोणत्याही आक्रमणाला स्वसंरक्षणाच्या नैसर्गिक अधिकारानुसार प्रखरपणे प्रत्युत्तर देऊ आणि ते त्यांना महागात पडेल असे इराणने म्हटले आहे.

'शक्यतो लवकर इराण सोडा'

नवी दिल्ली : इराणमधील परिस्थिती पाहता भारताने तेथे राहणाऱ्या सुमारे १० हजाराहून अधिक आपल्या नागरिकांना मिळेल त्या वाहतूक साधनांचा वापर करून देश सोडण्याचा सल्ला दिला आहे. नागरिकांनी पासपोर्ट, इमिग्रेशन पेपर, ओळखपत्र जवळ ठेवावे असेही सांगण्यात आले आहे.

इराणला चोहोबाजूंनी लक्ष्य करणारी अमेरिकेची युद्धसज्जता

सद्यःस्थिती : अमेरिकेने २००३ च्या इराक युद्धानंतर पहिल्यांदाच इराणभोवती मोठ्या प्रमाणावर लष्करी सामर्थ्य गोळा केले आहे. अमेरिकेच्या दोन युद्धनौकापैकी एक ओमानच्या आखातात आहे तर दुसरी ग्रीसच्या जवळ पोहोचली आहे. तेथून ती भूमध्य समुद्राकडे जात आहे.

नौदल : यूएसएस अब्राहम लिंकन आणि यूएसएस जेराल्ड फोर्ड या दोन महाकाय विमानवाहू युद्धनौकांसह १७ विनाशिका तैनात. 'टॉमहॉक' क्रूझ क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रधारी पाणबुड्या पर्शियन आखातात सज्ज आहेत.

हवाई दल : एफ-३५, एफ-२२ ही स्टेल्थ फायटर जेट्स आणि बी-२ बॉम्बर विमाने हाय-अलर्टवर. कतार व युएईमधील तळांवरून १२० हून अधिक लढाऊ विमाने इराणच्या अणुकेंद्रांवर लक्ष ठेवून आहेत.

भूदल : पश्चिम आशियात सुमारे ५० हजार अमेरिकी सैनिक तैनात आहेत. इराणच्या कोणत्याही क्षेपणास्त्र हल्ल्याला रोखण्यासाठी 'थाङ' आणि 'पॅट्रियट' क्षेपणास्त्रे सज्ज.

अमेरिकेच्या अटी काय आहेत?

इराणने युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवावे. केवळ अणु प्रकल्पच नाही, तर दीर्घ पल्ल्यांचा क्षेपणास्त्र विकासावरही मर्यादा हव्यात. 'आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगा'ला इराणमध्ये प्रवेश द्यावा.

इराणच्या अटी अमेरिकेने इराणच्या तेल निर्यात व बँकिंग क्षेत्रावरील आर्थिक निर्बंध उठवावेत. वीज, औषधांसाठी युरेनियम संवर्धन करण्याचा अधिकार कायम ठेवावा. अमेरिकेने जगभरात गोठवून ठेवलेली इराणची कोट्यवधी डॉलर संपत्ती त्वरित मुक्त करावी.

Web Title: Iran-US war clouds! 'Mission Armada', superpower's impenetrable military siege around Iran