भारताशी पंगा घेतला तर सर्वांनाच त्रास होईल, पाकिस्तानकडून काय मिळणार? त्यांच्याच पक्षाच्या खासदाराने ट्रम्प यांना दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 16:11 IST2026-01-17T15:51:02+5:302026-01-17T16:11:59+5:30
ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध बिघडले आहेत. वॉशिंग्टनने भारताकडून रशियन तेल खरेदीवर अतिरिक्त २५ टक्के कर लादला, यामुळे एकूण कर ५० टक्क्यांवर पोहोचला.

भारताशी पंगा घेतला तर सर्वांनाच त्रास होईल, पाकिस्तानकडून काय मिळणार? त्यांच्याच पक्षाच्या खासदाराने ट्रम्प यांना दिला इशारा
पाकिस्तानला आरसा दाखवत, अमेरिकेचे रिपब्लिकन काँग्रेसमन आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचे नेते रिच मॅककॉर्मिक आपल्याच देशाला आरसा दाखवला. "भारताच्या तुलनेत पाकिस्तान अमेरिकेत गुंतवणूक आकर्षित करण्यात अपयशी ठरला आहे. वॉशिंग्टनमधील प्रतिष्ठित थिंक टँक सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अन्ड इंटरनॅशनल स्टडीज यांच्या कार्यक्रमात बोलताना मॅककॉर्मिक यांनी स्पष्ट केले की, भारत केवळ अमेरिकेतून गुंतवणूक खेचत नाही, तर स्वतःही अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. यावेळी त्यांनी ट्रम्प प्रशासनाला इशारा दिला. भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळे पाडणे हे सर्वांसाठीच गंभीर अडचणी निर्माण करणारे ठरू शकते, असंही ते म्हणाले.
मॅककॉर्मिक यांनी सांगितले की, Pakistan हा सुमारे ३० कोटी लोकसंख्येचा देश असला, तरी तो अमेरिकेत गुंतवणूक आणताना दिसत नाही. याउलट India केवळ गुंतवणूक स्वीकारत नाही, तर स्वतःही अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतो.
भारताच्या प्रतिभाशक्तीवर भर देताना मॅककॉर्मिक म्हणाले की, भारत फक्त कुशल मनुष्यबळ अमेरिकेला पाठवत नाही, तर हेच लोक अमेरिकेतील विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. “टॅलेंटला खूप महत्त्व आहे आणि भारत जगभरात मोठ्या प्रमाणात प्रतिभावान मनुष्यबळ पुरवत आहे. ही बाब केवळ प्रतिभावान लोक पाठवण्यापुरती मर्यादित नसून, ते अमेरिकेत निर्माण झालेल्या महत्त्वाच्या रिकाम्या जागाही प्रभावीपणे भरून काढत आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प प्रशासनाला एक कडक संदेश
गेल्या काही महिन्यांत, ट्रम्प पाकिस्तानकडे वळले आहेत, यामुळे भारताशी संबंध ताणले गेले आहेत. इंडो-पॅसिफिक प्रदेशात भारताला चीनचा प्रतिकार करणारा देश म्हणून पाहिले जात आहे. ट्रम्प यांनी अलिकडेच पाकिस्तानी नागरिकांसाठी स्थलांतरित व्हिसा प्रक्रिया थांबवून इस्लामाबादला कडक इशारा दिला. या संदर्भात, एका अमेरिकन कायदेकर्त्याने ट्रम्प प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की, भारताला वेगळे करणे अमेरिकेसाठी एक मोठी समस्या निर्माण करू शकते. ते म्हणाले, "जर अमेरिका भारताला मित्र म्हणून स्वीकारेल तर शांतता आणि समृद्धी येईल. जर आपण भारताला वेगळे केले तर ते आपल्या सर्वांसाठी एक मोठे संकट असेल."
पाकिस्तानात अमेरिकेची गुंतवणूक नाही
या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या भारतीय वंशाच्या डेमोक्रॅटिक काँग्रेसमन एमी बेरा यांनीही मॅककॉर्मिक यांच्याशी सहमती दर्शवली. त्यांनी सांगितले की अमेरिका आणि पाकिस्तान अलीकडे जवळ आले असले तरी अमेरिकन कंपन्या पाकिस्तानमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत नाहीत. बेरा यांनी स्पष्टपणे सांगितले की, "अमेरिका पाकिस्तानसोबत धोरणात्मक भागीदारी निर्माण करत नाही. अमेरिकन कंपन्या तिथे अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत नाहीत. हे सर्व भारतात घडत आहे."