अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 07:01 IST2026-05-01T07:01:18+5:302026-05-01T07:01:54+5:30

हे फुगे स्थानिक बाजारात सुमारे १००० ते १५०० रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. तज्ज्ञांनी ही पद्धत अत्यंत धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. सुरक्षा विश्लेषकांचं म्हणणं आहे

Extremely dangerous! Cooking in balloons filled with gas is being done in Pakistan; This is like a walking bomb | अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब

अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात पाकिस्तानला मध्यस्थीची संधी मिळाली असली आणि पाकिस्तान त्यामुळे स्वत:ची पाठ थोपटून घेत असला तरी, निदान आजवर तरी पाकिस्तानची ही मध्यस्थी कुणालाच फायद्याची ठरलेली नाही. उलट इराणच्या अनेक तज्ज्ञांनी पाकिस्तान हा भरवशाचा देश नसल्यानं पाकिस्तानऐवजी भारत मध्यस्थ असायला हवा होता, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

पाकिस्तान कितीही गमजा मारत असला तरी त्यांना रोज नव्यानं नवनवीन समस्यांना ताेंड द्यावं लागतंय. पाकिस्तानात जवळपास प्रत्येक गोष्टीची टंचाई आहे आणि प्रत्येक वस्तूचे भाव गगनाला भिडलेले आहेत. स्वयंपाकाचा गॅस तर तिथे जवळपास हद्दपारच झाला आहे. सर्वसामान्यांना स्वयंपाकाचा गॅस मिळणं दुरापास्त झाल्यानं अनेकांनी आता फुग्यामध्ये एलपीजी गॅस भरून त्यावर स्वयंपाक करणं सुरू केलं आहे. तज्ज्ञांनी याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली असून, हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब असल्याचं म्हटलं आहे. हा ‘बॉम्ब’ केव्हाही, कोणाचाही जीव घेईल, त्यामुळे हा प्रकार तातडीनं बंद व्हावा आणि नागरिकांना तातडीनं एलपीजी गॅसचा पुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. पाकिस्तानात गॅसची मोठी कमतरता असल्यामुळे लोक आता प्लॅस्टिकच्या फुग्यांमध्ये गॅस भरून त्याद्वारे स्वयंपाक करू लागले आहेत. 

हा धोकादायक प्रकार विशेषतः कराचीमध्ये पाहायला मिळत आहे. तिथल्या लोकांचं म्हणणं आहे, सातत्यानं मागणी करूनही गॅस मिळत नाही. अनियमित गॅसपुरवठ्यामुळे ‘जुगाड’ करण्याशिवाय आता त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नाही. स्वयंपाकासाठी गॅस मिळावा यासाठी लोक एका खास प्रकारच्या प्लास्टिकच्या फुग्यांमध्ये गॅस भरतात. थोड्या वेळासाठी गॅस पुरवठा झाला की हे फुगे भरून घेतले जातात आणि नंतर त्याचाच वापर करून स्वयंपाक केला जातो. 

हे फुगे स्थानिक बाजारात सुमारे १००० ते १५०० रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. तज्ज्ञांनी ही पद्धत अत्यंत धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. सुरक्षा विश्लेषकांचं म्हणणं आहे, प्लॅस्टिकच्या फुग्यांमध्ये गॅस भरणं म्हणजे ‘मोबाइल बॉम्ब’सारखं आहे, कारण अगदी हलकं घर्षण, उष्णता किंवा ठिणगीही मोठा स्फोट घडवू शकते. घरांमध्ये अशा गॅसनं भरलेले फुगे ठेवणं म्हणजे स्वत:हून अपघाताला आणि मृत्यूला निमंत्रण आहे. विशेषतः दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे ऊर्जा पुरवठा साखळी प्रभावित झाली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीसारख्या महत्त्वाच्या मार्गावरही परिणाम झाल्यानं गॅस आणि तेल पुरवठा संकटात आहे. कराचीमध्ये अनेक वर्षांपासून गॅसची कमतरता, कमी दाब आणि दीर्घकाळ कपातीची समस्या सुरू आहे. हिवाळ्यात तर परिस्थिती आणखी वाईट होते, कारण त्यावेळी मागणी आणखी वाढते आणि पुरवठा तर जवळपास बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. घरगुती गॅस (मिथेन/एलपीजी) अत्यंत ज्वलनशील असतो. थोडीशीही गॅसगळती झाली आणि जवळ ठिणगी, काडेपेटी किंवा विजेचा स्पार्क आला, तर लगेच आग पसरू शकते किंवा स्फोट होऊ शकतो. म्हणूनच तज्ज्ञांनी हा चालता-फिरता बॉम्ब’ आपल्यापासून दूरच ठेवण्याचा सल्ला दिला आहे. 

Web Title : पाकिस्तान: गैस से भरे गुब्बारों से खाना बनाना, चलता-फिरता बम!

Web Summary : पाकिस्तान में गैस की कमी है। बेहाल नागरिक खाना पकाने के लिए गैस से भरे गुब्बारों का उपयोग करते हैं, जो विस्फोट के खतरे के कारण विशेषज्ञों द्वारा 'चलता-फिरता बम' है।

Web Title : Pakistan: Cooking with Gas-Filled Balloons, a Walking Bomb!

Web Summary : Pakistan faces gas shortages. Desperate citizens use gas-filled balloons for cooking, a dangerous practice experts call a 'walking bomb' due to explosion risks.