शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

एडेम आणि सारस पक्षी : तेरा वर्षांची दोस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 09:30 IST

Friendship: जे पेराल, तेच उगवतं हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही जर प्रेम केलं, दुसऱ्याला प्रेम दिलं, तर त्या बदल्यात तोही तुमच्या प्रेमाची दामदुपटीनं परतफेड करेल. तुम्ही जर एखाद्याचा सतत तिरस्कार केला, द्वेष केला, तर तुम्हालाही तेच मिळण्याची शक्यता जास्त. प्राणी आणि माणसांच्या बाबतीतही हे खरं आहे.

 जे पेराल, तेच उगवतं हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही जर प्रेम केलं, दुसऱ्याला प्रेम दिलं, तर त्या बदल्यात तोही तुमच्या प्रेमाची दामदुपटीनं परतफेड करेल. तुम्ही जर एखाद्याचा सतत तिरस्कार केला, द्वेष केला, तर तुम्हालाही तेच मिळण्याची शक्यता जास्त. प्राणी आणि माणसांच्या बाबतीतही हे खरं आहे. त्यांच्या दोस्तीच्या अनोख्या कहाण्या आपण आजवर अनेकदा ऐकल्या आहेत. याच यादीत आणखी एका अफलातून दोस्तीची कहाणी सामील झाली आहे. ही कहाणी आहे तुर्कीचा एक गरीब मच्छिमार आणि राजबिंड्या सारस पक्षाच्या दोस्तीची!

तेरा वर्षांपूर्वीची गोष्ट. तुर्कीमधील बर्सा या शहराजवळील एस्किकारागाक हे एक छोटंसं गाव. एडेम यिलमाज हा तिथला एक गरीब, वृद्ध मच्छिमार. गावात एक छोटासा तलाव आहे. या तलावातले मासे पकडायचे, ते विकायचे आणि आपला उदरनिर्वाह चालवायचा, हे त्याचं रोजचं काम. 

त्यादिवशी तो आपल्या बोटीत बसून तलावात मासेमारी करीत होता. तेवढ्यात त्याच्या पाठीमागून आवाज आला. त्यानं मागे वळून पाहिलं तर त्याच्या वल्ह्याच्या टोकावर एक राजबिंडा, रुबाबदार पक्षी बसलेला होता. तोच एडेमला ‘हाका’ मारत होता. हा होता सारस पक्षी. विणीच्या हंगामात दरवर्षी ते अक्षरश: हजारो किलोमीटरचा प्रवास करतात आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच ठिकाणी येतात. माणसांच्या वस्तीजवळ ते राहत असले तरी माणसांच्या इतक्या जवळ ते कधीच येत नाहीत. हा सारस पक्षी आपल्या इतक्या जवळ आलेला, आपल्या शेजारी बसलेला पाहून एडेम यांनाही आश्चर्य वाटलं. त्याला भूक लागली असेल असं वाटून त्यांनी त्याच्या दिशेनं हवेत एक मासा उडवला. त्यानं तो हवेतच झेलला. त्यानंतर दुसरा, तिसरा.. असे अनेक मासे एडेम यांनी त्याच्या दिशेनं भिरकावले. पोट भरल्यावर तो उडून गेला. 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या वर्षीही हा सारस पक्षी पुन्हा एडेम यांच्याकडे, ते तलावात मासेमारी करीत असताना आला. यावेळीही त्यांनी त्याला तसेच मासे भरवले आणि त्यानं ते हवेतल्या हवेत गट्टम केले. यानंतर मात्र त्यांचा याराना वाढला आणि दरवर्षी हा सारस पक्षी त्यांच्या भेटीला येऊ लागला. पुढच्या वर्षी तो येतो की नाही, म्हणून तो गेल्यानंतर दरवर्षी एडेम यांना हुरहुर लागून राहायची, पण या सारस पक्ष्यानं आपल्या यारी-दोस्तीचा सिलसिला सोडला नाही आणि आपल्या ज्येष्ठ मित्राला नाराजही केलं नाही. 

यंदा हे तेरावं वर्ष आहे. तो सलग एडेम यांच्याकडे पाहुणचाराला येतो आहे आणि एडेमही त्याचं अगदी मनापासून आगतस्वागत करताहेत. आपली परिस्थिती कशीही असली तरी त्यांनी त्याचा ‘पंचपक्वान्ना’चा पाहुणचार कधी चुकवला नाही. 

तुर्कीमध्ये सारस पक्षाला ‘यारेन’ असं म्हटलं जातं. ‘यारेन’ या शब्दाचा अर्थही साथी, सोबती, सखा असाच आहे. दरवर्षी वसंत ऋतूत यारेन पुन्हा इथे परत येतो आणि एडेन यांच्या घराला, त्यांच्या मनाला पालवी फुटते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यारेन आला की दरवर्षी त्याची ‘मैत्रीण’ नाजली हीदेखील येते. या कुटुंबाचं घरटंही एडेम यांच्या घराजवळच आहे. या दोघांचा पाहुणचार करताना दिवस कसे सरतात आणि त्यांची जाण्याची वेळ कधी येते हे एडेम यांनाही समजत नाही.

गेली १३ वर्षे हे न चुकता सुरू आहे. दरवर्षी हे जोडपं त्यांच्याकडे येतं, त्याच घरट्यात ते राहतात, आपला संसार करतात, एडेम यांचा पाहुणचार स्वीकारतात आणि हजारो किलोमीटर दूर निघून जातात, ते पुन्हा परत येऊ हे आश्वासन देऊनच!

सुरुवातीला गावकऱ्यांनी एडेम यांना वेड्यात काढलं, आपले मासे आणि वेळ ते  फुकट घालवताहेत म्हणून! पण एडेम यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. यारेन आणि एडेम यांच्या दोस्तीच्या पाचव्या वर्षी मात्र आल्पर टाइड्स या वाइल्डलाइफ फोटोग्राफरनं त्यांची कहाणी चित्रबद्ध केली आणि त्यानंतर ती सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली. त्यानंतर मात्र दोघेही सेलिब्रिटी बनले आणि जगभरात त्यांच्या चाहत्यांची संख्या प्रचंड वाढली.

मरते दम तक नहीं टुटेंगी ये दोस्ती!२०१९ मध्ये या अनोख्या दोस्तीच्या कहाणीवर एक डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली. २०२० च्या प्राग फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री म्हणून ती गौरवली गेली. याच कहाणीवर आता एक शॉर्ट फिल्मही येऊ घातली आहे. एडेम यांचं गावही या दोस्तीमुळे पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येतंय. त्यांच्या दोस्तीचं शिल्प गावात उभारण्यात आलंय. यारेन आता साधारण १७ वर्षांचा आहे, तर एडेम ७० वर्षांचे. सारसचं आयुष्य साधारण तीस वर्षे असतं. म्हणजे दोघांकडेही आता आयुष्याचे साधारण तेवढेच दिवस उरले आहेत. एडेम म्हणतात, आमची दोस्ती मरेपर्यंत तुटणार नाही!

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय