Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...

By ऋचा वझे | Updated: April 19, 2026 09:18 IST

मुली लवकर मूव्ह ऑन होतात..., गौरव गेरा झाला इमोशनल

'धुरंधर' आणि 'धुरंधर २' या दोन्ही ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये 'आलम भाई'ची भूमिका साकारणारा अभिनेता गौरव गेरा सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून 'धुरंधर २'ची कमाई अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये. चित्रपटामधील प्रत्येक पात्राचे कौतुक होत असताना गौरव गेराच्या अभिनयाने प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली आहे. गौरव गेराला खरी ओळख २२-२३ वर्षांपूर्वी 'जस्सी जैसी कोई नहीं' या मालिकेतून मिळाली होती, मात्र सध्या जे स्टारडम त्याला मिळत आहे, त्याचा अनुभव त्याने याआधी कधीही घेतला नव्हता. गौरव ५२ वर्षांचा असून अविवाहित आहे. त्याने लग्न का केलं नाही याचं कारण आता त्याने सांगितलं आहे.

ब्रेकअप झाल्यानंतर पुन्हा कधीच प्रेमात पडलो नाही 

५२ वर्षांचा असूनही गौरव अद्याप अविवाहित आहे आणि भविष्यातही लग्न करण्याचा त्याचा कोणताही विचार नाही. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या जुन्या नात्याबद्दल आणि झालेल्या 'हार्ट ब्रेक'बद्दल मनमोकळेपणाने सांगितले. या एका नात्याचा त्याच्यावर इतका खोलवर परिणाम झाला की, त्याने पुन्हा कधीही कोणाच्या प्रेमात न पडण्याचा आणि लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल बोलताना गौरव म्हणाला की, "एक काळ असा होता जेव्हा मी प्रेमात खोलवर बुडालो होतो. मात्र आता मला पुन्हा कधीही त्या काळात परत जायचे नाहीये. मला आयुष्यात कोणालाही इतके महत्त्व द्यायचे नाही की, त्या व्यक्तीकडे मला दुखावण्याचा किंवा मानसिक त्रास देण्याचा अधिकार येईल." या एका कटू अनुभवामुळे त्याने संसाराचा मोह कायमचा सोडून दिला आहे.

यावेळी गौरवने स्त्रियांच्या मानसिकतेवरही आपले मत मांडले. तो म्हणाला, "मला असे वाटते की स्त्रिया खूप लवकर आयुष्यात पुढे (Move On) जातात. काही लोक तर फक्त दिखावा करतात, त्यांच्यावर नातं तुटण्याचा कोणताही परिणाम होत नाही. 'धुरंधर' चित्रपटापूर्वी देखील मला महिलांकडून अटेंशन मिळायचे, पण आता तर मी काकासारखा (Uncle) दिसू लागलो आहे."

वर्कफ्रंट

गौरव गेराच्या करिअरची सुरुवात डान्सर म्हणून झाली होती आणि तेच त्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. मुंबईत आल्यानंतर एक वर्षाने त्याला 'लाईफ नही लड्डू' ही पहिली टीव्ही मालिका मिळाली, ज्यामध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. २३ वर्षांच्या गौरवने या शोमध्ये मनोज पाहवा आणि संजय मिश्रा यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले. हा त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. त्यानंतर 'जस्सी जैसी कोई नहीं' या मालिकेतील 'नंदू'च्या भूमिकेने त्याला घराघरात पोहोचवले. या मालिकेच्या सेटवरच त्याची अभिनेत्री मोना सिंहशी मैत्री झाली, जी आजही टिकून आहे. त्यानंतर त्याने 'कोई अपना सा', 'बात हमारी पक्की है', 'तोता वेड्स मैना' आणि 'मिसेस पम्मी प्यारेलाल' यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

गौरवने केवळ टीव्हीच नाही तर चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. 'धुरंधर'पूर्वी त्याने 'दसविदानिया', 'चलो दिल्ली', 'वुडस्टॉक विला' आणि 'एमपी३: मेरा पहला पहला प्यार' यांसारख्या चित्रपटात भूमिका केल्या होत्या. त्याचा पहिला चित्रपट ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय यांचा 'क्यूं हो गया ना' हा होता. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर 'आलम भाई'च्या रूपात गौरवला आज त्याचे खरे यश मिळाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Dhurandhar's' Alam Bhai, 52, unmarried; reveals reason for not marrying.

Web Summary : Gaurav Gera, famed as 'Alam Bhai,' remains unmarried at 52 due to a past heartbreak. He avoids deep relationships fearing emotional pain. Gera, recognized from 'Jassi Jaisi Koi Nahin,' enjoys newfound stardom post-'Dhurandhar' success and focuses on his acting career.
टॅग्स :धुरंधर सिनेमाबॉलिवूडलग्न