"आता तर खूप भीती वाटतेय, याचा अंत नाही", ड्रोन हल्ल्यानंतर दुबईतून एका आईचा मेसेज व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 09:06 IST2026-03-01T09:05:27+5:302026-03-01T09:06:32+5:30
ड्रोन हल्ले आणि स्फोटांच्या बातम्यांमुळे लोक घाबरलेले आहेत.

"आता तर खूप भीती वाटतेय, याचा अंत नाही", ड्रोन हल्ल्यानंतर दुबईतून एका आईचा मेसेज व्हायरल
जेव्हा एखाद्या देशात युद्ध किंवा हल्ल्याची बातमी येते, तेव्हा सर्वात जास्त काळजी त्या लोकांना वाटते ज्यांचे नातेवाईक त्या ठिकाणी राहत असतात. फोनची रिंग वाजताच धडधड होऊ लागते, मेसेजची वाट पाहत असतात आणि डोक्यात फक्त एकच प्रश्न फिरत असतो - तिथे परिस्थिती कशी असेल? आपली माणसं सुरक्षित आहेत का? वाढत्या तणावाच्या दरम्यान, दुबईसारख्या शहरात राहणाऱ्यांच्या कुटुंबीयांची अशीच काहीशी अवस्था झाली आहे.
ड्रोन हल्ले आणि स्फोटांच्या बातम्यांमुळे लोक घाबरलेले आहेत. याच भीती आणि चिंतेच्या वातावरणात एका भारतीय उद्योजकाने आपल्या आईचा व्ह़ॉट्सएप मेसेज शेअर केला आहे, ज्यातून स्पष्ट दिसतं की, सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरातही आता लोकांच्या मनात भीती घर करून बसली आहे. हाँगकाँगमध्ये राहणारे भारतीय व्यावसायिक प्रकाश ददलानी यांनी आपल्या कुटुंबाच्या व्ह़ॉट्सएप ग्रुपचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
Dubai is one of the safest cities in the World.
— Prakash Dadlani (@prakdadlani) February 28, 2026
Never imagined my family chat would look like this one day. pic.twitter.com/GlWTniMgsr
या चॅटमध्ये दुबईत राहणाऱ्या त्यांच्या आईने आपली भीती व्यक्त केली आहे. अमेरिका आणि इस्रायलनेइराणवर हल्ला केल्यानंतर परिस्थिती बिघडली. याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही अनेक ठिकाणी हल्ले केले. दुबई विमानतळ आणि 'बुर्ज अल अरब' सारख्या मोठ्या ठिकाणांना टार्गेट करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. या बातम्यांनंतर लोक रात्रभर भीतीत जगत आहेत.
"आकाशात क्षेपणास्त्रे, स्फोटांचे आवाज..."; दुबईत अडकला सुपरस्टार; शेअर केला भयानक Video
चॅटमध्ये त्यांच्या आईने लिहिलं, "आता तर खूप भीती वाटत आहे. याचा काही अंत नाही." दुसऱ्या एका मेसेजमध्ये म्हटलं आहे की, घराच्या मागेही स्फोटांसारखे आवाज ऐकू आले. प्रकाश ददलानी यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, दुबईची गणना नेहमी जगातील सर्वात सुरक्षित शहरांमध्ये केली जाते, परंतु असा दिवसही पाहावा लागेल असं कधीच वाटलं नव्हतं.
अमेरिका-इस्रायलच्या एअर स्ट्राईकमुळे इराणमधील मुलींची शाळा उद्ध्वस्त; ८५ विद्यार्थिनींचा मृत्यू
युएई (UAE) च्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हवाई दलाने अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच रोखले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ड्रोनच्या अवशेषांमुळे 'बुर्ज अल अरब' हॉटेलमध्ये आग लागली होती, परंतु ती विझवण्यात आली असून कोणीही जखमी झालेलं नाही. 'जेबेल अली' बंदरावरही आग लागली होती, ज्यावर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.