अमेरिकेच्या राजकारणातून एक धक्कादायक आणि तितकीच खळबळजनक बातमी समोर आली आहे. कॅलिफोर्नियातील आर्केडिया शहराच्या माजी महापौर एलीन वांग यांनी आपण चीन सरकारच्या 'एजंट' म्हणून काम करत असल्याचे अधिकृतपणे कबूल केले आहे. या कबुलीनंतर अमेरिकन प्रशासनासह संपूर्ण जगात खळबळ उडाली असून, 'ड्रॅगन'ने कशा प्रकारे अमेरिकन लोकशाहीत घुसखोरी केली आहे, हे उघड झाले आहे.
नेमकं प्रकरण काय?
५८ वर्षीय एलीन वांग या लॉस एंजेलिसजवळील आर्केडिया शहराच्या कौन्सिल सदस्य आणि माजी महापौर होत्या. अमेरिकन तपास यंत्रणांच्या दाव्यानुसार, २०२० ते २०२२ या काळात वांग यांनी चीन सरकारच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून अमेरिकेत चीन समर्थक प्रचार केला. विशेष म्हणजे, यासाठी त्यांनी अमेरिकन सरकारची कोणतीही परवानगी घेतली नव्हती किंवा त्यांना याबद्दल अंधारात ठेवले होते.
'न्यूज सेंटर'च्या नावाखाली चिनी प्रोपोगंडा
एलीन वांग यांनी केवळ राजकीय पदाचा वापर केला नाही, तर जनमत वळवण्यासाठी एका वेबसाईटचाही आधार घेतला. त्यांनी आपला सहकारी याओनिंग माईक सन याच्यासोबत मिळून 'US News Center' नावाची वेबसाईट चालवली. ही वेबसाईट विशेषतः अमेरिकेत राहणाऱ्या चिनी समुदायासाठी होती. या पोर्टलवर चीन सरकारच्या बाजूने लेख आणि बातम्या प्रसिद्ध केल्या जात होत्या. शिनजियांग प्रांतात उइगर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या खोट्या असल्याचे सांगून चीनची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात होता.
१० वर्षांच्या कारावासाची टांगती तलवार
अमेरिकन कायद्यानुसार, जर कोणी परदेशी सरकारसाठी काम करत असेल, तर त्याची नोंदणी करणे अनिवार्य असते. वांग यांनी हे नियम पायदळी तुडवून गुप्तपणे चीनचे आदेश पाळले. या प्रकरणी आरोप निश्चित झाल्यानंतर त्यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता त्यांना जास्तीत जास्त १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
एफबीआयचा इशारा
FBIचे अधिकारी रोमन रोजहाव्स्की यांनी या प्रकरणावर कडक भाष्य केले आहे. "एलीन वांग यांनी स्वतः कबूल केले आहे की त्या चीनच्या हितासाठी काम करत होत्या. अमेरिकेत राहून विदेशी शक्तींसाठी छुप्या पद्धतीने काम करणाऱ्यांना सोडले जाणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. वांग यांचे सहकारी याओनिंग सन यांना आधीच चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.