पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 04:48 IST2026-05-04T04:47:46+5:302026-05-04T04:48:21+5:30

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगावरील युद्धाचे ढग गडद होत असतानाच खऱ्याखुऱ्या ढगांवरून आता नवंच युद्ध पेटलं आहे. त्यावरून दावे-प्रतिदावे आणि नवे वादविवाद सुरू झाले आहेत.

Countries stealing rain? Sensational accusations of 'rain theft' against America and Israel; What exactly is the matter? | पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?

पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगावरील युद्धाचे ढग गडद होत असतानाच खऱ्याखुऱ्या ढगांवरून आता नवंच युद्ध पेटलं आहे. त्यावरून दावे-प्रतिदावे आणि नवे वादविवाद सुरू झाले आहेत. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराकचे खासदार अब्दुल्ला अल - खैखानी यांनी अमेरिका आणि इस्रायलवर मध्यपूर्वेतील ढग चोरण्याचा आरोप केला आहे.

अब्दुल्ला अल-खैखानी यांचं म्हणणं आहे, अमेरिका आणि इस्रायल अनेक वर्षांपासून विमानांच्या मदतीनं मध्य पूर्वेतले ढग चोरत आहेत. याच कारणामुळे या प्रदेशात बऱ्याच काळापासून दुष्काळ पडतोय. अमेरिका आणि इस्रायल सध्या इराणसोबतच्या युद्धात गुंतले आहेत, त्यामुळे ढग चोरण्याकडे त्यांचं तितकंसं लक्ष नाही, त्यामुळेच पाऊस या भागात पुन्हा परत आलाय!

अब्दुल्ला यांनी दावा केलाय की, हवामान बदलणाऱ्या शस्त्रांचा वापर करून अमेरिका आणि इस्रायलनं मध्यपूर्वेत दुष्काळ निर्माण केलाय. वायुमंडलात बदल करून जाणीवपूर्वक पाऊस थांबविण्यात आला. ढगचोरीसाठी ‘ॲटमॉस्फेरिक मॉडिफिकेशन वेपन’चा वापर करण्यात आला.

अब्दुल्ला यांच्या विधानानंतर सोशल मीडियावर या दाव्याबाबत घमासान चर्चा सुरू आहे. यासंदर्भातील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, युद्धामुळे अमेरिकन विमानं तुर्कियेच्या हवाई क्षेत्रात जाऊ शकत नाहीत, त्यामुळेच सध्या तिथे सतत पाऊस पडतोय. नाहीतर याआधी इथला पाऊस कुठे गेला होता? तो आपोआप सुरू झालेला नाही आणि आपोआप थांबलाही नव्हता. ही पोस्ट दहा लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली.

काही यूझर्सनी दावा केलाय की, इराणमध्ये दशकांपासून चालू असलेला दुष्काळ, अमेरिकेच्या तळांवरील हल्ल्यानंतर पाच दिवसांत संपला!

मात्र यासंदर्भात हवामानतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, अशाप्रकारे ढग चोरण्यासाठी कोणतंही तंत्रज्ञान उपलब्ध नाही. इराक हवामान विभागाचे प्रवक्ते अम्र अल - जबिरी यांनी म्हटलं आहे, हा दावा ना वैज्ञानिक आहे, ना तर्कसंगत! २०२६ हे वर्ष इराकसाठी पावसाचं ठरणार आहे, असा अंदाज मागच्या वर्षी सप्टेंबरमध्येच वर्तवण्यात आला होता.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे, असे दावे विश्वासाच्या कमतरतेतून आणि हवामानाबाबतच्या अपुऱ्या समजुतीतून निर्माण होतात. हवामानबदलाचा हा परिणाम आहे. संयुक्त राष्ट्र विद्यापीठाचे कावेह मदानी यांच्या मते, क्लाउड सीडिंगला राजकीय शस्त्रासारखं दाखवलं जातंय. क्लाउड सीडिंगमध्ये ढगांवर छोटे केमिकल कण (उदाहरणार्थ सिल्व्हर आयोडाइड) टाकले जातात, ज्यामुळे पाऊस पडायला मदत होते. मात्र याचा परिणाम खूप मर्यादित असतो. विद्यमान ढगांमधून जास्तीत जास्त १५ टक्क्यांपर्यंतच पावसात वाढ करता येऊ शकते.

खलिफा युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक डायना फ्रान्सिस यांच्या मते, क्लाउड सीडिंगमुळे ढगांना थोडासा धक्का मिळतो. पण, हवामान नियंत्रणात येत नाही.

जागतिक हवामान संघटनेनुसार (WMO), गेल्या काही दशकांत या प्रदेशातील तापमान जागतिक सरासरीच्या दुप्पट वेगानं वाढलंय. यामुळं उष्णतेच्या लाटा जास्त काळ टिकतात आणि अधिक तीव्र होतात, तसेच पावसाचा पॅटर्नही अनियमित झालाय. एकूणच पाऊस कमी होत चाललाय. पण, जेव्हा पडतो तेव्हा खूप जोरात पडतो, ज्यामुळे फ्लॅश फ्लड किंवा दुष्काळाचा धोका वाढतो.

Web Title : अमेरिका, इजराइल पर बारिश चुराने का आरोप: क्या है 'बादल चोरी'?

Web Summary : इराकी सांसद का आरोप है कि अमेरिका और इजराइल मध्य पूर्व से बादल चुरा रहे हैं, जिससे सूखा हो रहा है। विशेषज्ञों ने इसे अवैज्ञानिक बताया है। उनका कहना है कि जलवायु परिवर्तन और सीमित क्लाउड सीडिंग प्रभाव के कारण ऐसा हो रहा है। क्षेत्र में तापमान बढ़ रहा है और अनियमित वर्षा हो रही है।

Web Title : US, Israel Accused of Stealing Rain: A Cloud Conspiracy?

Web Summary : Iraqi MP alleges US and Israel are stealing Middle Eastern clouds, causing drought using weather modification weapons. Experts dismiss this as unscientific, attributing changes to climate change and limited cloud seeding impact. Region faces rising temperatures and erratic rainfall.