आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 06:29 IST2026-05-04T06:28:43+5:302026-05-04T06:29:38+5:30
नसरापूरच्या पीडित मुलीच्या वडिलांनी जड अंतःकरणाने आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘आज बरेच राजकारणी लोक भेटण्यास आणि सांत्वन करण्यास घरी येत आहेत. माझी व माझ्या कुटुंबीयांची एकच इच्छा आहे.

आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
पुणे : नसरापूर येथे नराधमाने क्रूरतेची सीमा गाठली आणि एका निष्पाप चिमुकलीचा बळी घेतला. आज या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील वातावरण भयाण असावे, तिथे सध्या मात्र राजकीय नेते आणि सांत्वनासाठी येणाऱ्यांची वर्दळ सुरू आहे. या गर्दीत एक पिता आपली वेदना सावरत असून, त्याने राजकीय नेत्यांना भावनिक आवाहन केले आहे.
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
नसरापूरच्या पीडित मुलीच्या वडिलांनी जड अंतःकरणाने आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘आज बरेच राजकारणी लोक भेटण्यास आणि सांत्वन करण्यास घरी येत आहेत. माझी व माझ्या कुटुंबीयांची एकच इच्छा आहे. जोपर्यंत माझ्या मुलीला न्याय मिळत नाही व त्या नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत एकाही राजकारणी नेत्याने आमच्या घरी येऊ नये. हे आमचे तुम्हाला हात जोडून नम्र आवाहन आहे.’
‘फाशीच्या दिवशीच या...’
‘ज्या दिवशी त्या नराधमाला फाशी होईल, त्याच दिवशी आम्ही सगळ्यांना भेटू,’ असे म्हणत या पित्याने न्यायव्यवस्थेकडे आपला डोळा ठेवला आहे. हे आवाहन केवळ नेत्यांसाठी नाही, तर समाजासाठी आहे. एखाद्याचे दुःख हे कधीही राजकीय व्यासपीठ बनू नये, याची जाणीव प्रत्येकाला होणे गरजेचे आहे.
आता प्रश्न उरतो तो हा की, हे नेते खरंच या कुटुंबाच्या वेदनेचा आदर करणार की, पुन्हा एकदा सांत्वनाच्या नावाखाली आपली उपस्थिती दर्शवून निघून जाणार? पीडित कुटुंब आता फक्त शांततेची आणि न्यायाची अपेक्षा करत आहे. समाजातील सुज्ञ नागरिकांनीही आता या सांत्वनाच्या राजकारणाकडे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची वेळ आली आहे.
या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून नराधमाला जलदरित्या फाशी देण्यात यावी, अशी मागणी जनसामान्याकडून प्रशासनाकडे केली जात आहे.
शक्ती कायदा तातडीने लागू करा : अनिल देशमुख
शक्ती कायद्यात गुन्हेगाराला २१ दिवसांत फाशी देण्याची तरतूद आहे. मात्र, दुर्दैवाने हा कायदा केंद्राकडे अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित आहे. आज शक्ती कायदा राज्यात लागू असता, तर नसरापूरच्या त्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती आणि अशा गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला असता, असे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
नराधमाला मृत्युदंडाची शिक्षा होईल : मुख्यमंत्री फडणवीस
नागपूर : नसरापूर येथे चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाला मृत्युदंडाची शिक्षा कशी होईल यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात प्रसार माध्यमांना सांगितले.
प्रकरण फास्ट ट्रॅकवर नेणार
मी काल स्वत: पीडितेच्या वडिलांशी दोनवेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितले, आपल्याला नराधमाला मृत्युदंडाची शिक्षा द्यायची आहे. त्यासाठी वेळेत चार्जशीट दाखल होणे आणि केस चालणे, माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेत आहोत.
आपल्या सगळ्यांना वाटतं, अशा नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे. पण, ते लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते. पण, कोणालाही कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये, यादृष्टीने कोणतीही पळवाट न ठेवता या नराधमाला मृत्युदंडाची शिक्षा कशी होईल, याचा प्रयत्न राज्य सरकार करेल.
न्यायालयात हे प्रकरण वेगाने मार्गी लावले जाईल. तसे पत्र आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिले असून त्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे, असे त्यांनी सांगितले.