या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
By विजय दर्डा | Updated: May 4, 2026 04:22 IST2026-05-04T04:20:56+5:302026-05-04T04:22:12+5:30
‘टॉवर ऑफ लंडन’मध्ये मी कोहिनूर पाहिला आहे. तो भारतात परतेल? कोहिनूर आपली जागा बदलत राहतो... काय सांगावे, येईलही घरी परत!

या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
डाॅ. विजय दर्डा
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
कोणताही काळ स्वतःला रक्तरंजित करून घेत नाही, परंतु काळाच्या कुशीत वाढणारा माणूस त्याला रक्तरंजित करत असतो. सध्याचा काळ असाच आहे. अशा रक्तरंजित काळात न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांना जगातील सर्वात नामांकित हिरा कोहिनूरची आठवण येऊन तो भारतात पाठवण्याची इच्छा व्हावी? -आश्चर्य तर वाटलेच. मग, मनात विचार आला, यात काही राजकारण तर नाही?
एप्रिलच्या शेवटी ब्रिटनचे राजे चार्ल्स अमेरिका दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्याच्या एकच दिवस आधी पत्रकारांशी बोलताना ममदानी यांना पत्रकारांनी विचारले, न्यूयॉर्कमध्ये चार्ल्स यांची भेट झाली, तर त्यांना काय सांगाल? - ममदानी म्हणाले, त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली, तर मी कोहिनूर हिरा भारताला परत करायला सांगेन !
२९ एप्रिलला राजे चार्ल्स आणि राणी कॅमिला यांनी ९/११ चे स्मृतीस्थळ आणि संग्रहालयाला भेट दिली. पीडितांच्या कुटुंबांना भेटले. तेव्हा, काही वेळ ममदानी यांच्याशी चार्ल्स बोलले. त्यांनी एकमेकांना अभिवादन केले, परंतु या भेटीत ममदानी यांनी कोहिनूरचा विषय काढला का, हे कळू शकलेले नाही.
परंतु पत्रकारांच्या समोर कोहिनूरचा मुद्दा उपस्थित करून ममदानी यांनी ब्रिटिश वसाहतवादाचा पूर्वइतिहास तर छेडलाच आहे. हा नावाजलेला हिरा परत करावा, अशी मागणी भारत वारंवार करत आलेला आहे. आता कोणी म्हणेल, न्यूयॉर्कच्या महापौरांना कोहिनूरशी काय देणे-घेणे? ममदानी यांची आई भारतीय वंशाची. त्या नात्याने कोहिनूरवर मत व्यक्त करण्याचा त्यांना हक्क आहे. परंतु, तेवढेच नाही. ममदानी यांनी कोहिनूर परत करण्याचा मुद्दा काढून स्वतःची प्रतिमाही उंचावून घेतली आहे. वास्तवात ममदानी केवळ ट्रम्प यांच्यावरच नव्हे, तर अनेकदा भारतावरही कठोर टीका करत असतात. परंतु, कोहिनूरच्या माध्यमातून त्यांनी भारतीय जनमानस आणि अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांना आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला आहे. ब्रिटनचा राजा अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना, कोहिनूरचा विषय काढणे सोपे नव्हे. त्यासाठीही जिगर पाहिजे.
यासंदर्भात मला अचानक ऑक्सफर्ड युनियनमध्ये शशी थरूर यांनी केलेले धुवांधार भाषण आठवले. ‘ब्रिटनने आपल्या वसाहतींची लूट करून स्वत:चे घर भरले’ हे सप्रमाण सांगताना थरूर म्हणाले होते, ब्रिटिश भारतात आले, तेव्हा जागतिक जीडीपीत भारताचा वाटा २३ ते २७% च्या दरम्यान होता; ते जेव्हा गेले, तेव्हा हा वाटा तीन टक्क्यांपेक्षाही कमी झालेला होता. ब्रिटनचा औद्योगिक विकास भारतीय साधनसामग्रीची लूट करून झालेला आहे.’ ब्रिटनने वसाहतींच्या काळात केलेले अत्याचार, लूट आणि हत्यांसाठी भारताची माफी मागितली पाहिजे, असेही थरूर यांनी ठणकावले होते.
ब्रिटनने केलेल्या लुटीमुळेच आज कोहिनूर भारताकडे नसून ब्रिटनकडे आहे, हे उघड होय. जाणकार म्हणतात, सध्याच्या स्थितीत कोहिनूरची किंमत एक अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त होईल. परंतु, त्या किमतीपेक्षाही जास्त महत्त्वाची गोष्ट ही की, कोहिनूर हा भारताचा गौरव आहे. कोहिनूर या शब्दाचा अर्थ आहे, प्रकाशाचा पर्वत. हा हिरा भारतातून ब्रिटनमध्ये गेला त्याचा प्रवासही रक्तरंजित कहाण्यांनी भरलेला आहे. इतिहासकार असे मानतात की, तेरा ते चौदाव्या शतकात केव्हा तरी आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातील गोवळकोंडा खाणीतून हा हिरा निघाला होता. आजही तो जगभरात अद्वितीय मानला जातो. त्यावेळी कोहिनूर सुमारे ७९३ कॅरेटचा होता. अनेक वेळा पैलू पाडल्यानंतर आता तो १०५.६ कॅरेटचा आहे.
खोदकामानंतर तो काकतीय राजवंशाकडे आला. इतक्या मोठ्या हिऱ्याची कीर्ती पसरणे स्वाभाविकच होते. चौदाव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफर याने जेव्हा दक्षिण भारतावर हल्ला केला, तेव्हा त्याला कोहिनूर शोधायचा होता. त्यात त्याला यश मिळाले आणि कोहिनूर अल्लाउद्दीन खिलजीच्या ताब्यात आला. १५२६ मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर तो बाबरकडे आला. बाबरचा पणतू शहाजहानने हा हिरा आपले सिंहासन ‘तक्त ए ताऊस’मध्ये जडवून घेतला होता. १७३९ मध्ये नादिरशहाने दिल्लीची लूट केली, तेव्हा त्याने कोहिनूर पर्शियात (सध्याचे इराण) नेला. त्यानेच या हिऱ्याला कोहिनूर हे नाव दिले. नादिरशहानंतर हा हिरा अहमदशाह अब्दाली व त्याच्या वंशजांकडे राहिला.
१८१३ मध्ये हा हिरा पुन्हा मिळवण्यात महाराजा रणजीत सिंह यांना यश आले, असे इतिहास सांगतो. परंतु, त्यावर ब्रिटिश साम्राज्याची वाईट नजर होती. रणजीत सिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र दलीप सिंह केवळ पाच वर्षांचे वय असताना महाराजा झाले. १८४९ मध्ये पंजाबला ब्रिटिश शासनाच्या अधिपत्त्याखाली आणण्याच्या प्रक्रियेत झालेल्या एका समझोत्यानुसार ब्रिटिशांनी कोहिनूर ताब्यात घेतला. अशा प्रकारे कोहिनूर लंडनला गेला. आता ब्रिटनचे म्हणणे असे की, हा हिरा कायदेशीर रीतीने आम्ही हस्तगत केला आहे. एका अल्पवयीन राजाला घाबरवून जो करार केला गेला त्याला करार म्हणायचे की कपट? - हे तर कपटच झाले !
मी टॉवर ऑफ लंडनमध्ये कोहिनूर पाहिला आहे. त्याच्याकडे पाहिल्यावर तो आपला वाटतो. तो कधी भारतात परतू शकेल? कोहिनूर आपली जागा बदलत असतो, असे इतिहास सांगतो. काळाचे काय सांगावे? कदाचित कोहिनूर घरी परत येईलही आणि भारताच्या मुकुटात जडेल!