सर्वात मोठी बातमी! इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू; ट्रम्प यांच्या दाव्यांनंतर इराणच्या सरकारी मीडियाने केली पुष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 07:20 IST2026-03-01T07:19:54+5:302026-03-01T07:20:47+5:30
Ayatollah Ali Khamenei killed : सुरुवातीला हे वृत्त फेटाळून लावणाऱ्या इराणने अखेर खामेनेई यांच्या निधनाची बातमी अधिकृतपणे प्रसारित केली आहे. इराणमध्ये आता शोककळा पसरली असून अनेक ठिकाणी लष्करी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सर्वात मोठी बातमी! इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू; ट्रम्प यांच्या दाव्यांनंतर इराणच्या सरकारी मीडियाने केली पुष्टी
तेहरान: गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा इस्रायल आणि अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे, या वृत्ताला इराणच्या अधिकृत 'प्रेस टीव्ही' ने दुजोरा दिला आहे. तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानावर झालेल्या भीषण बॉम्बफेकीत खामेनेई मारले गेले आहेत.
युद्धातील सर्वात मोठा कलाटणी देणारा क्षण
सुरुवातीला हे वृत्त फेटाळून लावणाऱ्या इराणने अखेर खामेनेई यांच्या निधनाची बातमी अधिकृतपणे प्रसारित केली आहे. इराणमध्ये आता शोककळा पसरली असून अनेक ठिकाणी लष्करी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी इराण सरकारने संपूर्ण देशात ४० दिवसांचा राष्ट्रीय शोकघोषित केला आहे. तसेच, येत्या ७ दिवसांसाठी देशात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
हल्ल्याची तीव्रता
इस्रायलच्या 'ऑपरेशन न्यू ऑर्डर' अंतर्गत खामेनेई यांच्या बंकर आणि निवासस्थानाला लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात खामेनेई यांच्यासह त्यांचे अनेक निकटवर्तीय आणि कुटुंबातील सदस्यही ठार झाले आहेत.
ट्रम्प यांचा दावा खरा ठरला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासांपूर्वीच 'ट्रुथ सोशल'वर खामेनेई मारले गेल्याची घोषणा केली होती, ज्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
मध्य-पूर्वेचे भविष्य काय?
१९८९ पासून इराणच्या सत्तेवर पकड असलेल्या खमेनेई यांच्या निधनानंतर आता इराणची सूत्रे कोणाकडे जाणार? आणि इराण याचे किती भीषण प्रत्युत्तर देणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.