पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 20:19 IST2025-10-13T20:18:19+5:302025-10-13T20:19:00+5:30
Amir Khan Muttaqi Education: अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत.

पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
India-Afghanistan Relation: अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी (Amir Khan Muttaqi) सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. ते ९ ते १६ ऑक्टोबर दरम्यान भारतात राहणार आहेत. त्यांचा हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जातोय, कारण तालिबान सरकारमधील एखाद्या मंत्र्याने भारतात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या दौऱ्याला भारत आणि अफगाणिस्तान (तालिबान प्रशासन) मधील संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.
कोण आहेत आमिर खान मुत्तकी ?
दरम्यान, तालिबान सरकारमधील वरिष्ठ नेते आणि सध्याचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी यांचे शिक्षण आणि त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. आमिर खान मुत्ताकी यांचा जन्म ७ मार्च १९७० रोजी हेलमंद प्रांतातील नद अली जिल्ह्यातील जरगुन गावात झाला. त्यांचे वडील हाजी नादिर खान हे सामान्य ग्रामीण पार्श्वभूमीचे व्यक्ती होते. मुत्ताकी हे मूळचे पक्तिया प्रांताचे रहिवासी आहेत, मात्र नंतर त्यांचे कुटुंब हेलमंदमध्ये स्थायिक झाले.
गावातील मशिदीतून सुरू झाले शिक्षण
मुत्ताकी यांनी आपले प्राथमिक शिक्षण गावातील मशिदीतच घेतले. याच ठिकाणी त्यांनी इस्लामी व पारंपरिक धार्मिक शिक्षणाची सुरुवात केली. त्या काळात अफगाणिस्तानात राजकीय अस्थिरता आणि संघर्ष सुरू होता, पण त्यांनी शिक्षण सुरूच ठेवले.
पाकिस्तानात शरण आणि धार्मिक शिक्षण
१९७९ मध्ये अफगाणिस्तानात कम्युनिस्ट शासन आणि सोव्हिएत आक्रमण झाल्यानंतर मुत्ताकींच्या कुटुंबाला देश सोडावा लागला. तेव्हा त्यांचे वय फक्त ९ वर्षे होते. कुटुंबासह ते पाकिस्तानात शरणार्थी म्हणून गेले. तिथे त्यांनी अफगाण शरणार्थ्यांसाठी स्थापन केलेल्या धार्मिक मदरसांमध्ये शिक्षण घेतले. मुत्ताकी यांनी या मदरसांमध्ये कुराण, हदीस, फिक्ह आणि इतर इस्लामी विषयांचे सखोल अध्ययन केले. काळानुसार ते धार्मिक विद्वान म्हणून समुदायात ओळखले जाऊ लागले.
सोव्हिएतविरोधी लढाई आणि तालिबानशी संबंध
रिपोर्ट्सनुसार मुत्ताकी यांनी सोव्हिएत समर्थित सरकारविरुद्धच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. ते हेलमंद प्रांतातील संघर्षात प्रत्यक्ष सहभागी झाले होते. डॉ. नजीबुल्ला यांच्या सरकारच्या पतनानंतर त्यांनी पुन्हा आपले अपुरे शिक्षण पूर्ण करण्यास सुरुवात केली.
प्रमुख वार्ताकार आणि अनुभवी कूटनीतिज्ञ
आमिर खान मुत्ताकी हे केवळ धार्मिक विद्वानच नाहीत, तर अनुभवी कूटनीतिज्ञ (डिप्लोमॅट) देखील आहेत. त्यांनी तालिबानचे संस्थापक मुल्ला उमर याच्या निर्देशावर अनेक वेळा आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये आणि वाटाघाटींमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांना तालिबान आणि बाह्य जग यांच्यातील संवादाचा प्रमुख दुवा मानले जातो. आता त्यांचा भारत दौरा दक्षिण आशियाई राजनैतिक समीकरणांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. या दौऱ्याद्वारे ते भारतासह इतर देशांशी संबंध सुधारण्यावर भर देत आहेत.