जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST2021-03-31T04:30:05+5:302021-03-31T04:30:05+5:30

हिंगोली : जिल्ह्यातील नागरिक अगोदरच कोरोना आजाराने त्रस्त झाले असताना उन्हाचा पारा वाढल्याने दुपारच्या सुमारास अंगाची लाहीलाही होत आहे. ...

Summer mercury increased in the district | जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला

जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला

हिंगोली : जिल्ह्यातील नागरिक अगोदरच कोरोना आजाराने त्रस्त झाले असताना उन्हाचा पारा वाढल्याने दुपारच्या सुमारास अंगाची लाहीलाही होत आहे. विजेचा लपंडाव उकाडा वाढवित असल्याने नागरिक त्रासले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील काही दुकानांसह शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका वगळता इतर दुकाने बंद आहेत. नागरिकांनी या काळात घराबाहेर पडू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. काही जण नियमांचे उल्लंघन करीत असले तरी बहुतांश नागरिक घरी थांबून प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. अगोदरच नागरिक कोरोनाने त्रस्त असताना त्यात वाढत्या उन्हाची भर पडली आहे. मागील काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाल्याचे जाणवत होते. त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. ३० मार्च रोजी तापमान ४० अंशावर पोहोचले होते. त्यामुळे दुपारच्या वेळी सूर्य आग ओकत होता. घरातही उकाडा जाणवत असल्याने पंखे, कूलर सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु, विजेच्या लपंडावामुळे यात अडथळा येत होता. मोकाट जनावरे, पशु, पक्ष्यांनी सावलीचा आधार घेतल्याचे पाहावयास मिळाले. तर शेतातील कामे सकाळच्या वेळीच करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. दरम्यान, उन्हाचा पारा वाढत असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Web Title: Summer mercury increased in the district