रोहयोची कामे होताहेत जेसीबीच्या साह्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:28 IST2021-03-20T04:28:11+5:302021-03-20T04:28:11+5:30

औंढा नागनाथ : तालुक्यात रोजगार हमीची कामे जवळचे नातेवाईक कामावरील मजूर म्हणून दाखवून जेसीबीच्या साह्याने कामे उरकली जात आहेत. ...

Rohyo's work is being done with the help of JCB | रोहयोची कामे होताहेत जेसीबीच्या साह्याने

रोहयोची कामे होताहेत जेसीबीच्या साह्याने

औंढा नागनाथ : तालुक्यात रोजगार हमीची कामे जवळचे नातेवाईक कामावरील मजूर म्हणून दाखवून जेसीबीच्या साह्याने कामे उरकली जात आहेत. त्यामुळे खऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. कुटुंबाचा गाडा कसा हाकावा, असा प्रश्न खऱ्या मजुरांपुढे उभा आहे.

गरीब मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी शासनाकडून सुरू करण्यात आलेली रोजगार हमी योजना तालुक्यात बारगळली असल्याचे पहायला मिळत आहे. रोहयो हमी योजना ही फक्त नावापुरती राहिली आहे. सिंचन विहिरींचे व इतर ग्रामपंचायत अंतर्गत होणारी रोजगार हमी योजनेची कामे सद्यस्थितीत जेसीबी यंत्राच्या साह्याने होत आहेत. जवळचे नातेवाईक मजूर म्हणून कामावर दाखवून अधिकारी आणि कर्मचारी यांना हाताशी धरून बिले उचलण्याचे काम सध्या पंचायत समिती अंतर्गत सुरू असल्याचे दिसून येत आहे.

औंढा पंचायत समितीतील घरकुल, रोजगार हमी व सिंचन विभागात गोंधळ सुरू आहे. अधिकारी व कर्मचारी ‘प्रसाद’ मिळाल्याशिवाय फाईल पुढे पाठवत नसल्याचे चित्र आहे. अनेक जण तर अधिकाऱ्यांपेक्षा मोठे झाल्याचे दाखवतात, अशाही तक्रारी आहेत. कोरोना संसर्गाच्या नावाखाली तर अनेक जण पोळी भाजून घेत आहेत. सध्या मजुरांच्या हाताला काम नाही. हे माहीत असतानाही सुद्धा जेसीबी यंत्राद्वारे कामे उरकून घेऊन खोटे लाभार्थी पुढे केले जात आहेत. त्यामुळे खरे लाभार्थी नाईलाजाने हाताला काम मिळत नाही, म्हणून इतरत्र जात आहेत.

मजुरांच्या हाताला काम द्या

नोंदणी केलेल्या मजुरांच्या हाताला काम द्या, असा शासनाचा आदेश असताना काही जण मात्र जेसीबीच्या साह्याने जवळचे नातेवाईक मजूर म्हणून दाखवून कामे उरकून घेऊन अधिकाऱ्यांची मनधरणी करुन बिले उचलत आहेत. खरे पाहिले तर नोंदणी केलेल्या मजुरांनाच कामे द्यायला पाहिजे, पण तसे होताना दिसून येत नाही. तालुक्यात १०१ ग्रामपंचायती असून मोजक्याच ग्रामपंचायत अंतर्गत सध्या रोजगार हमीचे काम सुरू आहे. त्यामुळे रोजगार हमीची कामे सुरू करण्याची मागणीही नागरिक करत आहेत. सर्वाधिक अंजनवाडा महादेव, सिद्धेश्वर, ढेगज, भागात जेसीबीच्या साह्याने सर्रास कामे होत आहेत. ग्रामसेवक व जेसीबी मालकाच्या आलबेल कारभाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. यात खरे मजूर मात्र कामापासून कोसो दूर आहेत. या बाबीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे.

फोटो १

Web Title: Rohyo's work is being done with the help of JCB