संगीतमय ध्यानधारणा शिबिरातून पोलिसांच्या तणावमुक्तीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST2021-02-23T04:46:17+5:302021-02-23T04:46:17+5:30

हिंगोली : पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदारांचा ताणतणाव दूर व्हावा, नकारात्मकता दूर व्हावी, यासाठी येथील नवीन पोलीस वसाहतीमधील कम्युनिटी हॉलमध्ये ...

Police stress relief efforts through musical meditation camps | संगीतमय ध्यानधारणा शिबिरातून पोलिसांच्या तणावमुक्तीचा प्रयत्न

संगीतमय ध्यानधारणा शिबिरातून पोलिसांच्या तणावमुक्तीचा प्रयत्न

हिंगोली : पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदारांचा ताणतणाव दूर व्हावा, नकारात्मकता दूर व्हावी, यासाठी येथील नवीन पोलीस वसाहतीमधील कम्युनिटी हॉलमध्ये २२ फेब्रुवारी रोजी संगीतमय ध्यानधारणा शिबिर घेण्यात आले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. कोरोनाला पायबंद घालण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सलग १२ तास व त्यापेक्षा अधिक वेळ कर्तव्य बजावत असल्याने पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वत:कडे व कुटुंबीयांकडे लक्ष देण्यास वेळ मिळेनासा झाला आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांमध्ये ताणतणाव जाणवत आहे. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या पुढाकारातून २२ फेब्रुवारी रोजी संगीतमय ध्यानधारणा शिबिर घेण्यात आले. यासाठी पुणे येथे कार्यरत मेडिटेशन ट्रेनर प्रा.डॉ. शिवाजी कुचे यांनी मार्गदर्शन केले. या शिबिराचा निश्चित फायदा होणार असून नकारात्मकता येणार नसल्याचे मत पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन लिपिकवर्ग, पोलिसांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केले. दरम्यान, २३ फेब्रुवारी रोजी सेनगाव, तर २४ फेब्रुवारी रोजी वसमत येथे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) सरदारसिंग ठाकूर यांनी दिली.

फोटो १२

Web Title: Police stress relief efforts through musical meditation camps