वृद्ध महिलेचा खून ; मृतदेह पुरला घाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:28 IST2021-04-11T04:28:52+5:302021-04-11T04:28:52+5:30

हिंगोली : वृध्द महिलेचा खून करून मृतदेह गावापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावरील घाटात पुरून टाकल्याचा प्रकार सेनगाव तालुक्यातील साखरा ...

Murder of an old woman; The bodies were buried in the ghats | वृद्ध महिलेचा खून ; मृतदेह पुरला घाटात

वृद्ध महिलेचा खून ; मृतदेह पुरला घाटात

हिंगोली : वृध्द महिलेचा खून करून मृतदेह गावापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावरील घाटात पुरून टाकल्याचा प्रकार सेनगाव तालुक्यातील साखरा येथे १० एप्रिलरोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आला. भारजाबाई मारोती इंगळे (वय ८५) असे त्या मृत वृद्धेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सेनगाव तालुक्यातील साखरा येथील भारजाबाई इंगळे घरी एकट्याच राहतात. त्यांची चार मुले गावातच इतर ठिकाणी राहतात. १० एप्रिल रोजी पहाटेच्यासुमारास अज्ञातांनी वृद्ध महिलेच्या घराचा दरवाजा उघडून त्यांचा खून करून गावापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावरील साखरा ते साखरा तांडा परिसरातील घाटात मृतदेह पुरून टाकला.

यानंतर पहाटेच्यासुमारास आखाड्यावरील कुत्र्यांनी त्यादिशेने भुंकण्यास सुरुवात केली. कुत्री भुंकत असल्याने काही शेतकऱ्यांनी त्या दिशेने धाव घेतली. जवळ जाऊन पाहिले असता, घाटामध्ये खड्डयात माती टाकलेली दिसून आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी हा प्रकार गावात सांगितला. तसेच पोलिसांनाही याबाबतची माहिती दिली. सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पो. नि. कृष्णदेव पाटील, पोउपनि अभय माकणे, जमादार राहुल कोरडे, दिलीप नाईक यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी घटनास्थळावर खोदून पाहिले असता, भारजाबाई इंगळे यांचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. तसेच गावातील सीसीटीव्ही फुटेजमधून काही सुगावा लागताे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. याप्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title: Murder of an old woman; The bodies were buried in the ghats