ज्येष्ठ म्हणून नुसताच मान; साधी पाण्याचीही सोय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST2021-04-01T04:30:20+5:302021-04-01T04:30:20+5:30

हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयातील डीईआयसी विभागात आरोग्य कर्मचारी, तसेच ज्येष्ठांना लस दिली जाते. परंतु, या ठिकाणी साधी ...

Just respect as a senior; There is no simple water facility | ज्येष्ठ म्हणून नुसताच मान; साधी पाण्याचीही सोय नाही

ज्येष्ठ म्हणून नुसताच मान; साधी पाण्याचीही सोय नाही

हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयातील डीईआयसी विभागात आरोग्य कर्मचारी, तसेच ज्येष्ठांना लस दिली जाते. परंतु, या ठिकाणी साधी पाण्याची व्यवस्थाही नसल्यामुळे प्रखर उन्हात ज्येष्ठांना ताटकळत रांगेत उभे राहावे लागते.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण प्रत्येक दिवसाला वाढत आहेत. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. १ एप्रिलपासून ज्येष्ठांना लस देण्याची मोहीम शासनाने आखली आहे. त्याप्रमाणे ज्येष्ठ मंडळी नित्यनेमाने लसीकरण करून घेत आहेत. परंतु, त्यांना रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे.

उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने ज्येष्ठ मंडळी सकाळी-सकाळी लसीकरण करून घेत आहेत. डीईआयसी विभागात पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठांनी केली. परंतु, अद्यापही जिल्हा रुग्णालयाने पाण्याची व्यवस्था काही केली नाही. ज्येष्ठांना घरूनच पाणी सोबत आणावे लागत आहे. लसीकरण विभागात बाकडे आहेत; पण तेही दोनच आहेत. त्यामुळे काही ज्येष्ठांना कोपऱ्यात बसण्याची वेळ येते.

उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याने तहानेने जीव व्याकूळ होत आहे. लसीकरणासाठी रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे बाहेर जाऊन पाणी आणणे शक्य होत नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील संबंधित विभागाने लसीकरणाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करणे गरजेचे आहे.

आरटीपीसीआर आणि अँटिजन जागा बदलावी

जिल्हा रुग्णालयातील डीईआयसी विभागात लसीकरण होते. याच बाजूला अँटिजन व आरटीपीसीआर चाचण्या होत आहेत. या चाचणीसाठी आलेले रुग्ण लसीकरण विभागात भेटायला येत आहेत. खरे पाहिले तर लसीकरण विभाग हा स्वतंत्र असायला हवा. परंतु, अजून तरी तज्ज्ञ डॉक्टर मंडळींच्या लक्षात हे कसे आले नाही? हाच मोठा यक्ष प्रश्न आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरटीपीसीआर आणि अँटिजन तपासणी या दुसऱ्या ठिकाणी व्हायला पाहिजे, तशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. परंतु, अद्यापही याचा विचार केला नाही.

Web Title: Just respect as a senior; There is no simple water facility