२ हजार ६३० मजुरांच्या हाताला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:30 IST2021-04-04T04:30:34+5:302021-04-04T04:30:34+5:30

हिंगोली : जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गंत १ हजार ४२८ जॉबकार्डावरील २ हजार ६३० मजुरांना कामे उपलब्ध करून ...

Hand work of 2 thousand 630 laborers | २ हजार ६३० मजुरांच्या हाताला काम

२ हजार ६३० मजुरांच्या हाताला काम

हिंगोली : जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गंत १ हजार ४२८ जॉबकार्डावरील २ हजार ६३० मजुरांना कामे उपलब्ध करून दिले आहेत. ऐन संचारबंदी काळात मजुरांच्या हाताला कामे मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.

मागील वर्षभरापासून कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. मध्यंतरी व्यवहार सुरळीत झाल्याचे चित्र होते. मात्र, जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा रोजगारांचा प्रश्न निर्माण झाला. याच काळात महात्मा गांधी रोजगार हमी योजना मजुरांच्या मदतीला धावून आली आहे. सध्या संचारबंदी लागू असली तरी या काळात १ हजार ४२८ जॉबकार्डावरील २ हजार ६३० मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये वसमत तालुक्यात २७५ कार्डावरील ४७३ जणांना रोजगार मिळाला आहे. हिंगोली तालुक्यात ९४८ कार्डावरील १ हजार ८१०, कळमनुरी तालुक्यात २०० कार्डांवरील ३४०, तर सेनगाव तालुक्यातील पाच जॉबकार्डावरील सातजणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. औंढा तालुक्यात सध्या एकाही ठिकाणी काम सुरू नसल्याचे रोहयोच्या संकेतस्थळावरून दिसून येत आहे.

मागील आर्थिक वर्षात ५३ हजार मजुरांना कामे

मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यातील २१८ गावांत ७०३ रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करून देण्यात आली होती. याअंतर्गत ५३ हजार मजुरांच्या हाताला कामे मिळाली होती. आता नवीन आर्थिक वर्ष सुरू होऊन दोन दिवसांचा कालावधी उलटला. या काळातही २ हजार ६३० जणांना रोजगार मिळाला आहे. कामाची मागणी वाढल्यास आणखीन कामे उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Hand work of 2 thousand 630 laborers