दुकाने बंदमुळे अनेकांवर ओढावले आर्थिक संकट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:26 IST2021-04-14T04:26:59+5:302021-04-14T04:26:59+5:30

मागील वर्षभरापासून बाजारपेठ कधी बंद तर कधी चालू अशी स्थिती आहे. वर्षभर दुकानात ग्राहकच आले नसल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ ...

Financial crisis has hit many due to closure of shops! | दुकाने बंदमुळे अनेकांवर ओढावले आर्थिक संकट !

दुकाने बंदमुळे अनेकांवर ओढावले आर्थिक संकट !

मागील वर्षभरापासून बाजारपेठ कधी बंद तर कधी चालू अशी स्थिती आहे. वर्षभर दुकानात ग्राहकच आले नसल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. धंदे चालत नाहीत. कोरोनामुळे सगळेच भयभीत झाले आहेत. सध्या निर्बंध लावलेली दुकाने उघडल्यास पोलीस व न.प.च्या आधिकाऱ्यांचे भय वाटते. उगाच पोलीस कार्यवाही व न.प.चा दंड नको म्हणून दुकाने बंद ठेवलेली बरी, अशी प्रतिक्रिया अनेक दुकानदारांनी व्यक्त केली आहे.

शनिवार, रविवार तर ब्रेक द चेन असल्याने सर्वच व्यवहार व बाजारपेठा बंद राहतात. व्यापार चालत नसल्याने दुकानात माल भरावा की नाही, कुटुंबाचा उदनिर्वाह चालवायचा कसा? असा प्रश्न पडतो. काही दुकानदारांनी तर माल भरूनही सततच्या संचारबंदी व ब्रेक द चेनमुळे ग्राहकच येत नसल्याने माल तसाच पडून आहे. कोरोनाला पायबंद घालण्यासाठी सॅनिटायझर, सामाजिक अंतराचे पालन केल्या जात आहे. मास्क असेल तर दुकानात प्रवेश देतात. सर्व काळजी घेत असतानाही दुकाने उघडता येत नाहीत. मध्यंतरी कोरोना कमी झाल्यामुळे दुकाने पूर्णपणे उघडण्यास परवानगी मिळाली होती; परंतु मध्येच कोरोनाने पुन्हा चांगलीच मुसंडी मारली व कोरोनाचा सर्वत्र फैलाव झाला. यामुळे लहान-मोठे व्यावसायिक चांगलेच हतबल झाले आहेत. कोरोना संकटामुळे आयुष्य बदलून गेले आहे. संसार चालवायचा कसा, मुला बाळांचे शिक्षण, कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न व्यावसायिकांवर येऊन ठेपला आहे.

सध्या बाजारावर मंदीचे सावट आहे. व्यवसाय चांगलाच कोलमडला आहे. आर्थिक ओढाताण वाढली आहे. वर्षभरापासून धंदाच नसल्याने धंद्यातून येणारे उत्पन्न कमी झाले आहे. सध्या व्यापारी वर्ग आर्थिक विवंचनेत आहे. ऐन लग्नसराईचे दिवस व त्यातच दुकाने बंद असल्याने आर्थिक संकट उभे राहिले आहे. यानंतर पावसाळा येतो. या काळात तर ग्राहकांची संख्याही कमी हाेते.

Web Title: Financial crisis has hit many due to closure of shops!