बडे दिलवाला शेतकरी! हिंगोलीत भीषण उन्हात थंडाव्यासाठी म्हशींसाठी उभारला 'स्विमिंग पूल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 15:13 IST2026-04-30T15:01:03+5:302026-04-30T15:13:10+5:30

८० म्हशींसाठी 'वॉटर पार्क' उभारणारा हिंगोलीचा प्रगतशील शेतकरी

Cool Relief! Progressive Farmer Rameshwar Mandge Creates 'Water Park' for Cattle in Belwadi of Hingoli | बडे दिलवाला शेतकरी! हिंगोलीत भीषण उन्हात थंडाव्यासाठी म्हशींसाठी उभारला 'स्विमिंग पूल'

बडे दिलवाला शेतकरी! हिंगोलीत भीषण उन्हात थंडाव्यासाठी म्हशींसाठी उभारला 'स्विमिंग पूल'

हिंगोली : गेल्या आठवडाभरापासून तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पार गेला असून, भीषण उकाड्याचा फटका केवळ मानवालाच नाही, तर मुक्या प्राण्यांनाही बसत आहे. विशेषतः म्हशींना वाढत्या तापमानाचा सर्वाधिक त्रास होतो. यावर उपाय म्हणून हिंगोली तालुक्यातील बेलवाडी येथील प्रगतशील शेतकरी रामेश्वर मांडगे यांनी आपल्या गोठ्यात चक्क म्हशींसाठी स्विमिंग पूल उभारून पशुधनाप्रती असलेल्या प्रेमाचा एक आगळावेगळा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.

रामेश्वर मांडगे हे मागील ५० वर्षांपासून दुग्धव्यवसायात कार्यरत असून पंचक्रोशीत त्यांची प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख आहे. महाराष्ट्र शासनाकडूनही त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या दुधाळ व्यवसायात ८० मोठ्या आणि ३० लहान म्हशी असून दररोज सुमारे ४०० ते ४५० लिटर दूध उत्पादन घेतले जाते. त्यांच्या या व्यवसायात कुटुंबातील सर्व सदस्यांचा सक्रिय सहभाग आहे. कठोर परिश्रम, नियोजन आणि आधुनिक पद्धतींचा अवलंब यांमुळे मांडगे कुटुंबाने दुग्धव्यवसायात यशस्वी वाटचाल केली आहे. सध्या त्यांनी उभारलेला म्हशींसाठीचा स्विमिंग पूल हा परिसरात चर्चेचा विषय ठरत असून इतर पशुपालकांनाही यापासून प्रेरणा मिळत आहे. जनावरांप्रती असलेले प्रेम आणि त्यांची काळजी घेण्याची ही आगळीवेगळी पद्धत निश्चितच कौतुकास्पद ठरली आहे.

म्हशींसाठी ‘वॉटर पार्क’चा अनुभव
पशुतज्ज्ञांच्या मते, म्हशींची त्वचा काळी असल्याने त्यांना उष्णता अधिक जाणवते. तापमान सहन न झाल्यास म्हशींचे दूध कमी होणे, इतकेच नव्हे तर गाभण म्हशींचा गर्भपात होण्याचाही धोका असतो. हीच जोखीम ओळखून रामेश्वर मांडगे यांनी आपल्या ८० मोठ्या आणि ३० लहान म्हशींसाठी एक प्रशस्त स्विमिंग पूल बांधला आहे. केवळ पाणी साठवून न थांबता, त्यांनी या पुलावर थंड पाण्याचे शॉवरदेखील बसवले आहेत.

वाढत्या तापमानापासून दिलासा
जनावरे बोलू शकत नाहीत, पण त्यांनाही वेदना होतात. कडक उन्हामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी आम्ही स्विमिंग पूल आणि त्यावर थंड पाण्याचे शाॅवर बसवले आहेत; त्यामुळे म्हशींना वाढत्या तापमानापासून दिलासा मिळत आहे. शिवाय दुधाचे प्रमाणही स्थिर राहण्यास मदत झाली आहे.
- रामेश्वर मांडगे, दूध उत्पादक शेतकरी, बेलवाडी

Web Title : किसान ने भैंसों को गर्मी से बचाने के लिए स्विमिंग पूल बनाया।

Web Summary : हिंगोली के किसान रामेश्वर मांडगे ने भीषण गर्मी में अपनी भैंसों के लिए स्विमिंग पूल बनाया। यह अभिनव तरीका जानवरों को ठंडा रखता है, दूध का उत्पादन बनाए रखता है, और पशु प्रेम को दर्शाता है। मांडगे की पहल अन्य डेयरी किसानों को प्रेरित करती है।

Web Title : Farmer builds swimming pool for buffaloes to beat the heat.

Web Summary : Hingoli farmer Ramेश्वर Mandge, facing extreme heat, built a swimming pool for his buffaloes. This innovative approach keeps the animals cool, maintains milk production, and showcases animal love. Mandge's initiative inspires other dairy farmers.