औंढा नागनाथ मंदिराचे संवर्धन वाऱ्यावर; ७.५ कोटींचा निधी मंजूर; पण कंत्राटदार पसार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 13:56 IST2026-04-21T13:55:11+5:302026-04-21T13:56:11+5:30
संवर्धन की विद्रुपीकरण? अर्धवट राहिलेली कामे आणि पसार झालेली कंपनी; औंढा नागनाथ मंदिराचा कारभार वाऱ्यावर.

औंढा नागनाथ मंदिराचे संवर्धन वाऱ्यावर; ७.५ कोटींचा निधी मंजूर; पण कंत्राटदार पसार!
-रमेश वाहुळे
औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एकमेव भूगर्भात असलेल्या औंढा नागनाथ मंदिराचे जतन आणि संवर्धनासाठी ७.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र, हे काम सहा महिन्यांत अर्धवट अवस्थेत असून, काम करणाऱ्या मुंबईच्या कंपनीने पळ काढल्याची माहिती आहे. अर्धवट कामावरून मात्र भाविकांत नाराजीचा सूर उमटत आहे.
मंदिराच्या ऐतिहासिक रचनेचे संवर्धन, पेव्हर ब्लॉक बसवणे, प्रकाश योजना आणि परिसर सुशोभीकरणासाठी हे काम मंजूर झाले होते. सुरुवातीला काही प्रमाणात प्रगती दिसली. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून काम पूर्णपणे ठप्प आहे. या कामामागे आर्थिक देवाण-घेवाणीचा म्हणजेच टक्केवारीचा प्रश्न निर्माण झाल्याने कंपनीने अर्धवट काम करून हातवर केले आहेत. काही लोकांच्या आर्थिक देवाण-घेवाणीमुळे मतभेद झाल्याने कंपनीने आपली यंत्रसामग्री आणि साहित्य काढून घेतल्याचीही माहिती आहे.
विश्वस्त मंडळ नसल्याने कारभार बिघडला
मंदिर संस्थानला सध्या अधिकृत विश्वस्त मंडळ नसल्याने हा संपूर्ण प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. विश्वस्त मंडळाअभावी कामाच्या देखरेखीवर आणि पारदर्शकतेवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. मुंबईहून हेरिटेज कंपनीने या कामासाठी अनुभवी कामगार, अभियंते आणि साहित्य पाठवले होते; परंतु वाद टाळून केलेल्या कामाचा मोबदला घेऊन कंपनीने पुढील काम थांबवण्याचा निर्णय घेतला. जर अधिकृत विश्वस्त मंडळ असते, तर कामावर योग्य देखरेख झाली असती आणि असा आर्थिक गुंता निर्माण झाला नसता; परंतु गेल्या अनेक वर्षांपासून विश्वस्त मंडळच नाही. त्यामुळेच हा प्रकार घडल्याचा सूर भाविकांतून पुढे येत आहे.
८९ लाखांचे बिल; पण प्रत्यक्षात काय?
कंपनीने ८९ लाख रुपयांचे बिल काढले असले तरी प्रत्यक्षात मंदिर परिसरात फारसे काम झालेले दिसत नाही. काही ठिकाणी पाइप तसेच उभे केलेले आहेत आणि बाकी साहित्य कंपनीने काढून नेले आहे. अर्धवट झालेल्या कामामुळे भाविक आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे.
भाविकांत नाराजीचा सूर
श्रावण महिन्यात हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अशावेळी मंदिर परिसरातील विकासात्मक, मंदिराचे जतन आणि सुशोभीकरणाचे काम अपूर्ण आहे. कोट्यवधी रुपयांचे काम मंजूर झाले होते; पण आता परिसराची अवस्था पाहून भाविकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रशासनाकडे चौकशीची मागणी
प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंजूर झालेले काम अर्धवट असणे ही एक गंभीर बाब समजली जात आहे. आता जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी नवीन यंत्रणा उभी करावी आणि विकासकामात लुडबूड होऊ नये, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, पुरातत्त्व विभाग औरंगाबाद या कार्यालयाशी संपर्क साधला असता, काही तांत्रिक बाबीवरून हा प्रकार घडल्याचे समजते; पण औंढा येथे मात्र वेगळीच चर्चा आहे.