जिल्ह्यातील तिन्ही आगारांतील बस आगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:29 IST2021-03-31T04:29:49+5:302021-03-31T04:29:49+5:30

हिंगोली : मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. एक अंकी आणि दोन अंकी संख्या केव्हाच पार केली ...

In the bus depots of the three depots in the district | जिल्ह्यातील तिन्ही आगारांतील बस आगारात

जिल्ह्यातील तिन्ही आगारांतील बस आगारात

हिंगोली : मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. एक अंकी आणि दोन अंकी संख्या केव्हाच पार केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तिन्ही आगारातील बस अगाारात लावल्या आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी २९ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान संचारबंदी लागू केली आहे. यापूर्वी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १ ते ७ मार्चदरम्यान संचारबंदी लागू केली होती. त्यादरम्यानही हिंगोली, वसमत आणि कळमनुरी आगारातील सर्वच बस आगारात लावल्या होत्या. परजिल्ह्यातून येणाऱ्या बस मात्र चालू होत्या. आजमितीस तिन्ही आगारांतील बस ज्या-त्या आगारात लावल्या आहेत; परंतु परजिल्ह्यातून येणाऱ्या बस मात्र सुरूच आहेत. बसस्थानकात उतरलेल्या प्रवाशांची अँटिजन तपासणी करूनच त्यांना बसस्थानकाच्या बाहेर पाठविले जात आहे.

२९ मार्च रोजी संचारबंदीचा दिवस होता. पहिल्या दिवशी बसस्थानकात थोडी वर्दळ होती. संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी बसस्थानकात पाच-सहा प्रवासी पाहायला मिळत होते. अँटिजन तपासणीच्या ठिकाणी रोज पाच-सहा कर्मचारी असायचे; परंतु प्रवाशांची वर्दळ नसल्यामुळे दोनच कर्मचारी अँटिजन तपासणीच्या ठिकाणी पाहायला मिळाले. परजिल्ह्यातून आलेल्या बसमधील प्रवाशांची अँटिजन तपासणी डॉ. नाविद अथकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुधा सपकाळ, भाग्यश्री राऊत, आशिष देशमुख करताना दिसून आले.

बसथांबे बंद करावेत

कोरोनाचे वाढते रुग्ण पाहून बस बंद करण्यात आलेल्या आहेत; परंतु बाहेरगावच्या बस चालू आहेत. काही प्रवासी वाहक-चालकांना विनंती करून बसथांब्यावर बस थांबवीत आहेत. त्यामुळे कोरोनाची भीती अधिक बळावू लागली आहे. कारण शेजारच्या परभणी, नांदेड, अकोला, वाशिम आदी जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तेव्हा जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन न करता परजिल्ह्यातील बस थेट आगारात आणल्या जाऊन प्रवाशांची अँटिजन तपासणी करणे गरजेचे आहे.

Web Title: In the bus depots of the three depots in the district