धनाढ्यांनीच थकविला कर

By Admin | Updated: February 7, 2016 02:31 IST2016-02-07T02:31:13+5:302016-02-07T02:31:13+5:30

साडेनऊ कोटींच्या कर वसुलीचा डोंगर सर करण्यासाठी गोंदिया नगर परिषदेची कसरत सुरू झाली आहे.

Tired of the rich man! | धनाढ्यांनीच थकविला कर

धनाढ्यांनीच थकविला कर

९.५० कोटींच्या वसुलीचा डोंगर : ‘टॉप टेन’ शासकीय संस्थांकडे ५० लाखांची थकबाकी
कपिल केकत  गोंदिया
साडेनऊ कोटींच्या कर वसुलीचा डोंगर सर करण्यासाठी गोंदिया नगर परिषदेची कसरत सुरू झाली आहे. मात्र यातील सर्वाधिक रक्कम शहरातील नामवंत धनाढ्यांकडे थकित असल्याचे पालिकेकडील आकडेवारीतून दिसून येते. कर थकबाकी ठेवण्यात शासकीय संस्थाही मागे नाहीत. त्यांच्याकडे ५० लाख ५४ हजार रुपयांचा कर थकित आहे. याशिवाय कर न भरणाऱ्या शहरातील १० धनाढ्यांकडे ३२ लाख ८२ हजारांची थकबाकी आहे. आता दोन महिन्यात ही वसुली करण्यात पालिकेला कितपत यश येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर वसुलीच्या बाबतीत येथील पालिकेची दैनावस्था सर्वश्रुत आहे. यासाठी शहरवासीयांची मानसिकता म्हणा किंवा कर वसुलीच्या कामात येत असलेला राजकीय अडसर म्हणा, कर वसुली पाहिजे तशी होत नाही. परिणामी कर वसुलीचा आकडा सहजासहजी कमी होत नसल्याचे दिसून येते. यंदा पालिकेला सुमारे साडेनऊ कोटींची कर वसुली करायची असून या रकमेतील सर्वाधिक रक्कम शहरातील नामवंत धनाढ्यांकडेच असल्याची माहिती आहे. या धनाढ्यांमध्ये काही नगर परिषद पदाधिकाऱ्यांचे नातेवाईकही आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील वसुली नगर परिषद करेल की त्यांना विशेष सूट दिली जाईल, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.
मागील वर्षी नगर परिषदेने कंबर कसून कर वसुली मोहीम हाती घेतली होती. तत्कालीन मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनीही यात भाग घेतल्याने ५० टक्केच्यावर कर वसुली करण्यात पालिका यशस्वी ठरली होती. यामुळेच मागील वर्षी ११ कोटींच्या घरात असलेला आकडा यंदा साडे नऊ कोटींवर आला आहे. मात्र ही वसुली करण्यासाठी पालिकेला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यासाठी नगर परिषदेला कडक पावले उचलत मोहिमेला गती द्यावी लागणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ७५ टक्के वसुलीचे टार्गेट
जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी पालिकेला यंदा ७५ टक्के कर वसुलीचे टार्गेट दिले आहे. त्यानुसार मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांनी गुरूवारी कर वसुली विभागाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मागील वर्षी केलेल्या नियोजन व कारवाईबाबत जाणून घेतले. त्यानुसार त्यांनी कर वसुलीत उतरण्याची हमी दर्शविली. तसेच कर वसुलीसाठी विविध विभागातील कर्मचाऱ्यांना घेऊन तयार केलेल्या पथकाला सोमवारपासून (दि.८) कर वसुली मोहिमेत उतरण्याचे आदेश दिले आहेत.
बाजार समितीकडील थकबाकीचे भिजत घोंगडे
शहरातील मुख्य थकबाकीदारांच्या यादीत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सर्वाधिक ४७ लाख ३८ हजार ३६९ रूपयांची थकबाकी नोंद आहे. मात्र बाजार समितीच्या ६२ खोल्या व २० झोपड्यांत पालिकेचे सफाई कामगार राहात असून त्यांच्यावर सन २००३-०४ पासूनचे भाडे थकून आहे. यामुळे बाजार समितीने हिशेब करण्याची मागणीही केली होती. मात्र आतापर्यंत हा हिशेब न झाल्याने यंदाही पालिकेच्या यादीत बाजार समितीच्या नावाने ही रक्कम दिसून येत आहे.

Web Title: Tired of the rich man!