अख्खे गाव हळहळले ! तीन मित्रांचा संशयास्पद मृत्यू ; साक्षगंधाच्या कार्यक्रमातुन जेवण करून निघाले आणि..
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 16:46 IST2025-10-06T16:43:54+5:302025-10-06T16:46:40+5:30
Gondia : देवरी तालुक्यातील पुराडा येथील तीन तरुणांचा गावालगतच्या गदाईबोडीत मृतदेह आढळून आल्याची घटना ५ आक्टोबर रोजी रात्री ११ वाजता उघडकीस

The whole village was shocked! The suspicious death of three friends; They left the Engagement program after having dinner and..
देवरी : तालुक्यातील पुराडा येथील तीन तरुणांचा गावालगतच्या गदाईबोडीत मृतदेह आढळून आल्याची घटना ५ आक्टोबर रोजी रात्री ११ वाजता उघडकीस आली. अभिषेक आचले (वय २०), आदित्य बैस (वय १६), तुषार राऊत (वय १८) रा. पुराडा अशी मृतकांची नाव आहे. हा अपघात की घातपात अशा शंका गावकरी व्यक्त करीत आहेत.
प्राप्त माहितीनुसार पुराडा येथे असले कुटुंबात मुलाच्या साक्षगंधाचा कार्यक्रम रविवारी होता. या कार्यक्रमाला सायंकाळच्या सुमारास गावातील नागरिक व मित्रमंडळी जेवण करायला आले होते. याच कार्यक्रमात गदेवारटोला (पुराडा) येथील आदित्य बैस, तुषार राऊत तसेच पुराडा येथील अभिषेक आचले हे उपस्थित होते. जेवण केल्यानंतर तिघेही मोटरसायकलने पुराडा येथील देश माता परिसरात फिरत असल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. मात्र रात्री ८ वाजेनंतर तिघेही तरुण घरी न पोहचल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. तेव्हा गावाजवळील गदाईबोडी जवळ तरुणांची मोटारसायकल दिसली. त्यानंतर काही अंतरावर छत्री व तरुणांच्या चपला आढळल्या.
निश्चित तिघेही पाण्यात बुडाले असावे असा संशय व्यक्त करीत त्यांचा मासेमारांच्या मदतीने शोध घेण्यात आला. रात्री ११ वाजताच्या सुमारास तिघांचे मृतदेह गदाइबोडीतील पाण्यातून बाहेर काढण्यात आले. यावेळी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. यावेळी आ. संजय पुराम घटना स्थळी उपस्थित होते. तिन्ही तरुणांच्या संशयास्पद मृत्यूची योग्य चौकशी करण्याचे आदेश आ. पुराम यांनी पोलिसांना दिले. तिघांच्या संशयास्पद मृत्यूमुळे पुराडा गावातील तिन्ही टोल्यात हळहळ व्यक्त केली जात असून घातपाताची शंका व्यक्त केली जात आहे. सालेकसा पोलिसांनी याप्रकरणी अर्ग दाखल केला असून तिन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय देवरी येथे नेण्यात आले.
तीन मृतांमध्ये दोन शाळकरी विद्यार्थी
५ सप्टेंबर रोजी पुराडा येथे झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. मृतकांमध्ये दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आदित्य सुनील बैस हा नूतन विद्यालय पुराडा येथील दहाव्या वर्गामध्ये शिकत होता. तर तुषार मनोज राऊत हा विद्यार्थी शासकीय आश्रम शाळा पुराडा येथे बाराव्या वर्गामध्ये शिक्षण घेत होता. तर अभिषेक आचले घरच्या कामाला हातभार लावण्याचे काम करीत होता. तिन्ही तरुणाचे वडील शेतकरी असून तिन्ही परिवारावर संकट कोसळले आहे. शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.