अद्याप वाटले नाही ५० लाख रुपये

By Admin | Updated: June 14, 2014 01:25 IST2014-06-14T01:25:51+5:302014-06-14T01:25:51+5:30

मागच्यावर्षी आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर ओला दुष्काळ राहिला.

Still not felt 50 lakh rupees | अद्याप वाटले नाही ५० लाख रुपये

अद्याप वाटले नाही ५० लाख रुपये

  गोंदिया : मागच्यावर्षी आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर ओला दुष्काळ राहिला. या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत केली. परंतु मदतीसाठी आलेल्या पैशातून ५० लाख रुपये वर्ष होत असले तरी वाटल्या गेले नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. गोंदिया जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टी झाली त्यामुळे गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शासनाने नुकसानभरपाई जाहीर केली. प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांना तहसील कार्यालयामार्फत हे पैसे देण्यात आले. परंतु देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे पैसे तेथील नाझर व लिपिकाने हडपले तर गोरेगाव तालुक्यातील पैसे शेतकऱ्यांना मिळालेच नसल्याची ओरड सुरू आहे. यासंदर्भात गोरेगाव येथील तहसीलदार डी.ए. सपाटे यांच्याशी या पैशासंदर्भात दुरध्वनीवरुन विचारपूस केली असता गोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ नुकसान भरपाई वाटपासाठी शासनाकडून पाच कोटी २९ लाख रुपये आले होते. परंतु यातील ५० लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप वळती करण्यात आले नाही. आमच्या तहसील कार्यालयामार्फत पैसे वाटपाची प्रक्रिया करण्यात आली. परंतु काही शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाकडे आपल्या बँकेचे खाते क्रमांक दिले नाही किंवा ज्या शेतकऱ्यांनी खाते क्रमांक दिले त्यांचे खाते क्रमांक चुकीचे आहे. त्यामुळे गोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे ५० लाख रुपये वाटप झाले नाही. तलाठ्यांमार्फत ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही त्यांचे खाते क्रमांक मागविण्यात येत आहे, असे सांगितले. यापूर्वी तहसील कार्यालयामार्फत त्या शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश त्यांच्या खात्यावर टाकण्यासाठी देण्यात आले. परंतु क्रमांक चुकीचा असल्यामुळे धनादेश परत आले असल्याची माहिती तहसीलदार सपाटे यांनी दिली. गोरेगाव तालुक्याती पलखेडा, तेढा, निंबा येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत मिळाली नसल्याने तेढा व घुमर्रा येथील तलाठ्यांवर नागरिकांचा असंतोष आहे. मागच्यावेळी या तलाठ्यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यास कुचराई केली होती. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. शशांक डोये यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Still not felt 50 lakh rupees