नियम मोडणाऱ्यांवर पथकाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:00 AM2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:01:54+5:30

व्यवसायीकांना दुकानात फिजिकल डिस्टंन्सिगचे पालन, हँडवॉश-सॅनिटायजरची व्यवस्था, किमान कर्मचारी, ग्राहकांची नोंद, मास्क लावणे, तंबाखू-गुटखा न खाणे व थूंकणे आदि नियम ठरवून देण्यात आले आहेत. मात्र व्यवसायी व नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत मनमर्जीने वागत आहेत. यामुळे शिथिलतेतून नुकसान उद्भवण्याची स्थिती दिसून येत आहे.

Squad eye on rule breakers | नियम मोडणाऱ्यांवर पथकाची नजर

नियम मोडणाऱ्यांवर पथकाची नजर

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना : कारवाईचा दणका

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाने ‘लॉकडाऊन’ शिथिल करीत दैनंदिन व्यवहारांना परवनगी दिल्याने बाजारपेठ पुन्हा फुगून निघाली आहे. मात्र ही परवानगी नियमांच्या अधीन राहूनच असल्याचा कित्येकांना विसर पडल्याचे दिसत आहे. कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनांना बगल दिली जात असल्याने नगर परिषदेने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व नियमांची अंमलबजावणी व्हावी यावर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक गठीत केले आहे. या पथकाची बाजारपेठेतील सर्वच हालचालीवर नजर असून नियम मोडणाऱ्यांना कारवाईचा दणका दिला जाणार आहे.
कोरोनामुळे अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आला आहे. त्यातही सुमारे दीड महिने ‘लॉकडाऊन’ कठोर असल्याने जीवनावश्यक वस्तू सोडून अन्य सर्व व्यवसाय बंद होते. यामुले मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी विस्कटली असतानाच व्यापारी व सामान्य नागरिकांचीही चांगलीच अडचण झाली. या दोन्ही बाजू सांभाळून घेण्यासाठी शासनाने ‘लॉकडाऊन’ शिथिल करीत सर्व व्यवसायांना परवानगी दिली. मात्र नियमांच्या अधीन राहून देण्यात आलेल्या परवानगीचा कित्येकांना विसर पडल्याचे दिसत आहे. व्यवसायी आपल्या व्यवसायासाठी तर सामान्य नागरिक आपली सुविधा बघत नियमांना बगल देत आहेत.
व्यवसायीकांना दुकानात फिजिकल डिस्टंन्सिगचे पालन, हँडवॉश-सॅनिटायजरची व्यवस्था, किमान कर्मचारी, ग्राहकांची नोंद, मास्क लावणे, तंबाखू-गुटखा न खाणे व थूंकणे आदि नियम ठरवून देण्यात आले आहेत. मात्र व्यवसायी व नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत मनमर्जीने वागत आहेत. यामुळे शिथिलतेतून नुकसान उद्भवण्याची स्थिती दिसून येत आहे. करिता बाजारपेठेत सुरू असलेल्या या सर्व व्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी नगर परिषदेने विशेष पथक गठीत केले आहे. हे पथक बाजारातील तसेच अवघ्या शहरावर नजर ठेवून आहे. पथकाला कोठेही नियमांचे उल्लंघन दिसून आल्यास त्यांन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथरोग अधिनियम १९८७ व इतर अनुषंगीक कायद्यांतर्गत कार्यवाही करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

परिसर ठरवून देत तीन पथकांचे गठन
नगर परिषदेने शहरातील बाजारपेठेवर विशेष नजर ठेवण्यासाठी ३ पथक गठीत केले असून त्यांना परिसर ठरवून दिलेला आहे. यामध्ये बाजार निरीक्षक मुकेश मिश्रा यांच्या नेतृत्वातील पथक सिंधी कॉलनी, झुलेलाल गेट, नगर परिषद- जयस्तंभ चौक ते मनोहर चौकपर्यंत कार्य करेल. परवाना निरीक्षक श्याम शेंडे यांच्या नेतृत्वातील पथक इंगळे चौक-नेहरू चौक-स्टेडियम परिसर, खोजा मस्जीद चौक-दुर्गा चौक पर्यंत कार्य करेल. तसेच कर निरीक्षक प्रदीप घोडेस्वार यांच्या नेतृत्वातील तिसरे पथक जुने श्रीजी लॉन, श्री टॉकीज-दिल्ली हॉटेल ते माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या घरापर्यंत कार्य करणार आहे. विशेष म्हणजे, या पथकांना ठरवून दिलेल्या या परिसरासह शहरात कोठेही नियमांचे उल्लंघन होत असल्यास कारवाई करता येणार आहे.

Web Title: Squad eye on rule breakers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.