तोलारी व मापारी यांचे धान खरेदी बंदला समर्थन

By Admin | Updated: December 9, 2014 22:54 IST2014-12-09T22:54:12+5:302014-12-09T22:54:12+5:30

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व सचिवांच्या तानाशाहीवृत्तीच्या निषेधार्थ व्यापारी संघटनेतर्फे व्यापारी, राईस मिलर्स, अडते व हमाल यांनी गेल्या दोन दिवसांपासून धान खरेदी व्यापार बंद पाळला.

Purchase of Dholari and Maula paddy procurement support | तोलारी व मापारी यांचे धान खरेदी बंदला समर्थन

तोलारी व मापारी यांचे धान खरेदी बंदला समर्थन

अर्जुनी/मोरगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व सचिवांच्या तानाशाहीवृत्तीच्या निषेधार्थ व्यापारी संघटनेतर्फे व्यापारी, राईस मिलर्स, अडते व हमाल यांनी गेल्या दोन दिवसांपासून धान खरेदी व्यापार बंद पाळला. या बंदला तोलारी व मापारी यांनी समर्थन दिले. त्यामुळे मंगळवारी शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्र सुध्दा बंद होते.
सभापती व सचिवांच्या तानाशाही वृत्तीविरुध्द तालुका व्यापारी संघटनेने ८ ते १० डिसेंबरपर्यंत बंद पाळला जात आहे. बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांना कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. व्यापाऱ्यांचे लायसन्स नुतनीकरण नाही. एवढे असूनही अवैधरित्या बाजार फी वसूल केली जाते. समितीमार्फत शेतकऱ्यांना ७ टक्के दराने शेतमालावर तारण दिले जात नाही.
केंद्रीय कृषी विभागाने ब ग्रेड धानाचे भाव १ हजार ३६०, अ ग्रेडचे १ हजार ४०० तसेच तांदळाचे २ हजार १५० रुपये दर ठरविले. मात्र सभापती काशिफ जमा कुरैशी व सचिव अशोक काळबांधे यांनी संचालक मंडळाला विश्वासात न घेता स्वमर्जीने १ हजार ५०० रुपये दर ठरविले. जास्तीचा सेस वसूल करण्यासाठी तांदळाचे सुध्दा २ हजार ३०० रुपये दर ठरविले.
४ डिसेंबर रोजी सभापतींनी व्यापारी व मिलर्स यांना अपमानित करून त्यांचेविरुध्द जिवे मारण्याची धमकी दिल्याची खोटी तक्रार पोलीस स्टेशनकडे केली. ते बोलताना उध्दट भाषेचा वापर करतात, असा आरोप व्यापारी संघटनेने केला आहे. उद्या बुधवारला सकाळी १० वाजेपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत साखळी उपोषण करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Purchase of Dholari and Maula paddy procurement support